ओरोग्य उपसंचालक कार्यालयाने पद भरती रखडविली : नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त
वार्ताहर / मालवण:
मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या अखत्यारितील ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर येथे आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक यांच्याकडून कर्मचाऱयांच्या नियुक्त्या लाल फितीत अडकवून ठेवण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने याबाबत वारंवार स्मरणपत्र देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून कोविड केअर सेंटर कधीही बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी स्वच्छता कर्मचारी, कंत्राटी सुरक्षा रक्षक यांचे अनेक महिन्यांचे मानधनही रखडल्याने शासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात दोन अधिपरिचारिकांची आवश्यकता आहे. परंतु त्यांच्या नियुक्त्या कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालकांकडून रखडवून ठेवण्यात आल्याने 2017 पासून ग्रामीण रुग्णालयासाठी दोन अधिपरिचारिका उपलब्ध झालेल्या नाहीत. तंत्रज्ञ, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांची पदे रिक्त असल्याने रुग्णालयाचा कारभार चालविणे कठीण बनले आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालयात शहरासह तालुक्यातील रुग्ण मोठय़ा संख्येने येतात. परंतु ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त असल्याने रुग्णांना वैद्यकीय सोई-सुविधा मिळणे कठीण झाले आहे. स्थानिक आमदार, खासदार रुग्णालयातील रिक्त पदांबाबत केवळ घोषणा करतात परंतु ती भरली जात नसल्याने रुग्ण व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कंत्राटी कर्मचाऱयांचे मानधन थकीत
रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱयांचे दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. सुरक्षा रक्षकांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. कोविड सेंटरमध्ये एक कर्मचारी पद रिक्त आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुकांचे आलेले अर्जही वरिष्ठांना पाठविण्यात आले. मात्र, कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालविणे कठीण बनले आहे.









