बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये कर्नाटकात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होत नाही. बुधवारी राज्यात ३९ हजाराहून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली, गेल्या१४ महिन्यांमधील हा एक नवीन विक्रम आहे. रविवारी सुमारे ३५ हजार नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर राज्य सरकारने सोमवारी १४ दिवस लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली होती, जी मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून अंमलात आली आहे. राज्यात सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या सुमारे ३.२९ लाख इतकी आहे. बेंगळूरमध्ये २.२४ लाख रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बेंगळूरमध्ये देशातील महानगरांमध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत. राज्यातील कोरोनामुळे बेंगळूरला सर्वाधिक फटका बसला आहे. बुधवारी सापडलेल्या नवीन रुग्णांपैकी २२ हजारांहून अधिक रुग्ण बेंगळूर शहरातील आहेत.
बुधवारी, आरोग्य विभागातील आकडेवारीनुसार २२.७० टक्के सकारात्मकतेच्या प्रमाणानुसार३९०४७ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यासह, राज्यात एकूण बाधित रुग्णांचे प्रमाण वाढून १४,३९,८२२ झाले. यापैकी १०,९५,८३३ जणांनी कोरोनावर मात मारण्यात यश आले आहे. बुधवारी बरे झालेल्या ११,८३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. नवीन प्रकरणांतून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सक्रिय प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात सध्या ३,२८,८८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २,१९२ आयसीयूमध्ये आहेत. यापैकी ८४२ बेंगळूर शहरात आहेत. राज्यात कोविडमुळे एकूण १५,०३६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २२९ रुग्णांचा मृत्यू बुधवारी झाला आहे.