बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक बनल्यानंतर, जेव्हा कोरोनाचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढू लागले, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासू लागली त्यावेळी भारतीय रेल्वेने राज्य सरकारच्या समन्वयाने ऑक्सिजन एक्सप्रेस चालविली. दरम्यान आज कर्नाटकात आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली. नैऋत्य रेल्वेच्या बेंगळूर रेल्वे विभागात सकाळी १० वाजता २५ वी ऑक्सिजन एक्सप्रेस इनलँड कंटेनर डेपो, व्हाईटफील्ड येथे पोहोचली अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
ही ऑक्सिजन एक्सप्रेस गुरुवारी सकाळी ९.१० वाजता जागनगरमधील कानालूसहून निघाली होती. ही ट्रेन चार कंटेनरद्वारे ८४.७५ टन द्रव ऑक्सिजन घेऊन आज सकाळी बेंगळूरला पोहोचली. दरम्यान, कर्नाटकाला आतापर्यंत रेल्वेने २८६९.२२ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरवठा झाला आहे.
भारतीय रेल्वेने आतापर्यंत ३५० हून अधिक ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या आहेत आणि कोरोनाच्या विरोधातील लढाईत देशभरातील १४३८ टँकर्सच्या माध्यमातून २४,३८७ टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक केली आहे.