लस वितरणावरही केली चर्चा
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. दरम्यान बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कर्नाटकचे आरोग्यमंत्री सुधाकर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना नियंत्रण उपायांचे व आरोग्य व्यवस्थेचे कौतुक केले. आगामी उत्सवाच्या हंगामात आणि हिवाळ्यामध्ये कोरोनाशी सामना करण्याची रणनीती तयार ठेऊन आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांविषयी सावध राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच यावेळी त्यांनी कोरोना संसर्ग नियंत्रणासह राज्यात कोरोना लस वितरण करण्याबाबतही विचारपूस केली.
डॉ.सुधाकर यांनी मृत्यू दर एक टक्क्यांपेक्षा खाली आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार सणांबाबत सावध आहे. दसऱ्या प्रमाणे कोरोना नियंत्रण नियमावलीचे दीपावली दरम्यान काटेकोरपणे पालन केले जाईल. तसेच केंद्र सरकारच्या अंतर्गत काही प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणीचे नमुने वाढविणे आवश्यक आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी केंद्र सरकारची मदत हवी असल्याचेही त्यांनी सांगितले.









