बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांनी राज्य सरकारविरूद्ध केलेल्या टीकेनंतर भाजप नेतृत्त्वाने अशा नाराज आमदारांना स्वतंत्रपणे संपर्क साधण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, ज्येष्ठ मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या विषयावर चर्चा करण्यासाठी कटील लवकरच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.
भाजपचे सरचिटणीस एन. रविकुमार यांनी माध्यमांशी बोलताना, बैठकीतील नेत्यांनी तक्रारी घेऊन पत्रकारांकडे जाणे योग्य नाही, असे मत मांडले. योगेश्वर आणि इतर नेत्यांच्या बाबतीत असे होत आहे, असे ते म्हणाले. “पक्षाच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी त्यांच्या तक्रारींबद्दल या
आमदारांशी चर्चा केली. कटील लवकरच येडीयुरप्पा यांची भेट घेतील आणि सर्व समस्या सोडवण्याची रणनीती तयार करतील, असे ते म्हणाले.
महसूलमंत्री आर. अशोक यांच्या मते, भाजप विधानमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही आमदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू, असे ते म्हणाले.