बेंगळूर/प्रतिनिधी
बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी हा निकाल जाहीर केला. दरम्यान, कर्नाटकमधील पूर्व-विद्यापीठाच्या (द्वितीय पीयू इयत्ता १२ वी च्या) परीक्षेसाठी प्रवेश घेतलेल्या एकूण ६,६६,४९७ उमेदवारांपैकी १४.२९ टक्के विद्यार्थी डिस्टिंक्शन’मध्ये उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली आहे. तसेच मूल्यांकन प्रक्रियेनंतर यावर्षी तब्बल २,२३९ विद्यार्थ्यांना पूर्ण गुण (६००/६००) मिळाले आहेत, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री यांनी सांगितले.
दरम्यान karresults.nic.in या वेबसाइटवर हा निकाल देण्यात आला आहे. विद्यार्थी या वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांना परीक्षा न घेता पदोन्नती देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. द्वितीय वर्षाच्या पीयूसी निकालांची गणना करण्यासाठी एक विशेष मूल्यांकन निकष तयार केले होते. निकषानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एकूण गुणांची गणना एसएसएलसी (इयत्ता १० वी) साठी मिळालेल्या गुणांपैकी ४५ टक्के, अकरावी ४५ टक्के आणि द्वितीय पीयूच्या अंतर्गत मूल्यांकनाचे १० टक्के गुण विचारात घेऊन टक्केवारी दिली आहे.