वृत्तसंस्था/ पुणे
कर्नाटक, जम्मू-काश्मिर, पंजाब, चंदिगड, राजस्थान, दिल्ली यांनी अकराव्या राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी चॅम्पियनशिपच्या तिसऱया दिवशी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या तिसऱया दिवशी पहिल्या सामन्यात कर्नाटकने पुडुचेरीचा 4-0 असा पराभव केला. हरीष मुटागर, एस. दीक्षित, शमंथ सीएस, पवन मडिवालर यांनी विजयी संघाचे गोल नोंदवले. गट क मधील अन्य एका सामन्यात जम्मू-काश्मिरने अरुणाचल प्रदेशवर 10-3 अशा गोलफरकाने विजय मिळविला. जेकेच्या जसप्रित सिंगने हॅट्ट्रिक, करणजित सिंग व मनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी 2, संदीप सिंग, हुसेन मोहम्मद दार यांनी एकेक गोल केले. अरुणाचलतर्फे संदीपने दोन, उचा सिंगने एक गोल नोंदवला.
गट ड मधील सामन्यात पंजाबने आंध्र प्रदेशवर 7-1 अशी एकतर्फी मात केली. कर्णधार रुपिंदर पाल सिंगने दुसऱयाच मिनिटाला गोल नोंदवला. त्यानंतर लवप्रीत सिंग, रणजोत सिंग, सुदर्शन सिंग (दोन गोल), परमप्रीत सिंग, संकल्प सिंग यांनीही गोल नोंदवले. आंध्रचा एकमेव गोल व्हीएसए बालाजीने 26 व्या मिनिटाला केला. गट ई मध्ये चंदिगड व मणिपूर या दोन तुल्यबळ संघांतील सामना अटीतटीचा झाला. पहिल्या दोन सत्रात गोलफलक कोराच राहिल्यानंतर तिसऱया सत्रात चंदिगडने प्रथम कोंडी फोडली. 42 व्या मिनिटाला अमनदीप सिंगने आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. मणिपूरने बरोबरीसाठी जोरदार आक्रमण करीत चंदिगडवर दडपण आणले. पण भक्कम बचाव करीत चंदिगडने आघाडी अखेरपर्यंत कायम राखत एकमेव गोलने विजय साकारला.
गट ई आणखी एका सामन्यात राजस्थानने त्रिपुराचा 18-0 असा फडशा पाडला. विजेंद्र सिंगने दुहेरी हॅट्ट्रिक नोंदवताना सहा गोल नोंदवले. त्याच्यासह राजस्थानच्या एकूण आठ खेळाडूंनी गोल नोंदवले. गोल नेंदवणाऱया अन्य खेळाडूंत श्याम सिंग चौहान (4 गोल), हशनप्रीत सिंग (2 गोल), करणजित सिंग (2) कर्णधार चंद्रांश शर्मा, अख्तर शोएब कुरेशी, चेतन कलोत, अमित कुमार सैनी यांचा समावेश आहे. दिवसातील शेवटच्या सामन्यात दिल्लीने मध्यप्रदेशचा 3-2 फरकाने पराभव केला.









