प्रतिनिधी /बेळगाव
लष्करात महिलांनाही भरपूर संधी उपलब्ध आहेत. योग्य मार्गदर्शन आणि परिश्रम केले की मुलींना त्या संधी उपलब्ध होतील. आगामी काळात बेळगाव भागातून ज्या तरुणी लष्करात जाऊ इच्छितात त्यांना हवे ते मार्गदर्शन करण्यास मी केव्हाही तयार आहे, असे विचार लष्करात लेफ्टनंट कर्नल म्हणून रुजू झालेल्या येळ्ळूरच्या पंकजा आनंद कुगजी यांनी व्यक्त केले.
येथील मराठा जागृती निर्माण संघातर्फे शनिवारी सायंकाळी गोपाळराव बिर्जे सभागृहात पंकजा कुगजी यांचा सत्कार करण्यात आला. वर्षा बिर्जे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघ प्रमुख गोपाळराव बिर्जे होते. याप्रसंगी पंकजा यांचे वडील अनंत, आई सुशीला यांच्यासह माजी नगरसेवक नेताजी जाधव, नारायण आमरोळकर, अमित कळसकर, अनंत लाड, निरंजन मुचंडी, आनंद चतूर, सौरभ बाळेकुंद्री, पी. जे. घाडी, विजय कंग्राळकर आदी उपस्थित होते.
बेळगाव भागातून लष्करात जाऊन हे उत्तम यश संपादन केल्याबद्दल गोपाळराव बिर्जे यांनी पंकजा कुगजी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. जयदीप बिर्जे यांनी स्वागत करून आभार मानले.









