प्रतिनिधी/ म्हापसा
शनिवारी मध्यरात्रीनंतर गौरावाडा-कळंगुट येथील हॉटेल ‘करिश्मा ग्रॅन्ड’ वर कळंगुट पोलिसांनी मारलेल्या छाप्यात जुगार व्यवसायात गुंतलेल्या 42 पर्यटकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची रोकड तसेच पाच हजारांहून अधिक चिप्स (प्रत्येकी एक हजार रुपये किमतीची) आणि 57 मोबाईल संच, दोन कार्ड स्वायपिंग मशिन्स पोलिसांनी जप्त केले आहे. हॉटेल करिश्मा ग्रॅन्डच्या दोन खोल्याही सीलबंद केल्या आहेत. सीआयडीने ऑगस्ट 2018 मध्ये केल्या नंतरची ही सर्वांत मोठी कारवाई कळंगुट पोलिसांनी केली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांविरुद्ध गोवा, दमण व दीव जुगार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. कळंगुट पंचायत तसेच गोवा पर्यटन खात्याच्या परवानगीचा हॉटेल करिश्माने बेकायदा जुगार व्यवसायासाठी गैरवापर केल्याचीही तक्रार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ऑगस्ट 2018 नंतरची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.
बहुतेक संशयित महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतील
या कारवाईत कळंगुट पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी बहुतेक संशयित आरोपी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, तेलंगण, मध्य प्रदेश व अन्य राज्यांतील धनाढय़ व्यवसायिक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
बहुतेक जुगारी तरुण वयोगटातील
जुगारात सहभागी झालेले सर्व पर्यटक 25 ते 45 वयोगटातील आहेत. त्यातील बहुतेकांनी मद्यप्राशन केले होते. काहींनी अतिमद्यप्राशन केल्याने त्यांना चालणे सोडाच, उभे राहणेही जमत नव्हते. पोलिसांनी त्यांना त्यांच्याच गाडय़ांमधून कडक पोलीस बंदोबस्तात पोलिसस्थानकावर नेले.
आयपीएलमुळे सट्टा खेळण्याचीही होती तयारी
पुढील आठवडय़ात आयपीएल स्पर्धा सुरु होणार असल्याने त्या काळात गोव्यात राहून सट्टा लावण्याचीही तयारी या जुगाऱयांपैकी काहींनी केली होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे कळंगुट पोलीस आता त्यादृष्टीने तयारी करणार आहे. दोनवर्षांपूर्वी कांदोळी येथे टाकलेल्या छाप्यात सट्टा खेळणाऱया अनेकांना अटक करुन त्यांच्याकडून लाखो रुपये तसेच मोबाईल, लॅपटॉप व अन्य यंत्रणा जप्त केली होती. याची पुरावृत्ती आता होऊ नये म्हणून पोलिसांनी याकडे कडक लक्ष ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
हॉटेलच्याविरुद्ध पंचायत, पर्यटनखात्याकडे तक्रार करणार
पर्यटकांच्या निवासासाठी असलेल्या खोल्या जुगारासाठी वापरल्याने हॉटेलकडून हा गौरवापर झाला असून याबाबत पोलीस स्थानिक कळंगुट पंचायतीला तसेच पर्यटन खात्याला याबाबत पत्र पाठवून हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
या कारवाईत कळंगुट पोलिसस्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ, निरीक्षक विजयनाथ कवळेकर, उपनिरीक्षक दिनेश गडेकर, विराज नाईक, तसेच अन्य पोलिस पथकाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास उतर गोवा पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
आंतरराज्य सीमा खुल्या झाल्याचा जुगाऱयांनी घेतला फायदा
मांडवी नदीतील तरंगले कॅसिनो बंद असल्याने काही हॉटेल्सनी आपल्याकडे आकर्षक जुगार सुरु असल्याच्या जाहिराती समाज माध्यमांवरुन तसेच ऑनलाईनद्वारे झळकविल्या होत्या. त्याची माहिती पोलीस निरीक्षक रापोझ यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याने ते या प्रकारावर लक्ष ठेवून होते. त्यातूनच शनिवारी मध्य रात्रीनंतर हा छापा टाकण्यात आला. जुगार खेळण्यासाठी आलेले सर्वजण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, पंजाब, तेलंगण, मध्य प्रदेश व अन्य राज्यांतील होते. काहीजण बडे माहीत जुगारी होते. आपल्या खासगी वाहानांतून ते आले होते. अनलॉक 4 सुरु झाल्यापासून सर्व सीमा खुल्या झाल्याची संधी साधत हे सर्वजण पर्यटक म्हणून हॉटेल ‘करिश्मा ग्रॅन्ड’मध्ये दाखल झाले होते.
निवासाच्या खोल्यांमध्ये मांडला जुगारी बाजार
‘करिश्मा ग्रॅन्ड’ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील दोन खोल्या खास जुगारासाठीच आरक्षित करण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री एका खोलीत 22 तर दुसऱया खोलीत 20 जुगारी होते. त्यांच्या जेवण्याची, पिण्याची व्यवस्था खोलीतच करण्यात आली होती. शनिवारी हॉटेलच्यासमोर अचानक गाडय़ांची गर्दी वाढल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला आणि प्रत्यक्षात छापा टाकला तेव्हा या जुगाराचा सारा पर्दाफाश झाला. निवासाच्या खोल्या जुगारासाठी वापरल्याने आता त्याविरुद्धही कारवाई होणार आहे.









