वार्ताहर/ कराड
यशवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित कोव्हिड हॉस्पिटल सुपर मार्केट कराड येथे शुक्रवारपासून सूरू करण्यात आले आहे. सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या कोव्हिड सेंटरचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडलअधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम, हॉस्पिटलचे संचालक डॉ. कृष्णत शेवाळे, डॉ. कुलदीप कदम, डॉ. रवी खेतमर, डॉ. राम पाटील, डॉ. कृष्णात शिंदे, डॉ. अजित सुतार यांच्यासह हॉस्पिटलचे स्टाफ व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये एकूण 30 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. यापैकी 11 बेड हे आयसीयू तर 12 स्पेशल बेड व दहा ऑक्सिजन बेड आहेत. तज्ञ डॉक्टर उपलब्ध करण्यात आले आहेत.
गेली आठ दिवसांपासून युध्द पातळीवर काम सुरू
दरम्यान येथील यशवंतराव चव्हाण बहूउद्देशिय हॉलमधील कोव्हिड सेंटर शनिवारी सुरू होत आहे. या सेंटरमध्ये 50 ऍक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गेली आठ दिवसांपासून येथे युध्द पातळीवर काम सुरू होते. महसूल प्रशासनाच्यावतीने याठिकाणी सेंटरसाठी लागणाऱया सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून उद्यापासून हे सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे रुग्णांसाठी करावी लागणारी पळापळ व परवड थांबण्यास मदत होणार आहे.








