कोल्हापूर/प्रतिनिधी
छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या नगरीत महिलांचे योगदान विसरलात का? असा सवाल आज सर्वपक्षीय महिलांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना केला. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वक्तव्य केले होते? त्या विरोधात आज सर्वपक्षीय महिलांनी ताराराणी चौकात निदर्शने केली. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महिलांच्या वतीने ताराराणी चौक येथे निदर्शने केली. यावेळी महिलांनी काळ्या साड्या परिधान करून, कपाळी काळा टीका लावून माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी भाजपच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा प्रचारादरम्यान महाडिक यांनी महिलांच्या कर्तृत्वावर सवाल उपस्थित केला होता. महाडिक यांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान झाल्याचा आरोप यावेळी सर्वपक्षीय महिलांनी केला. करवीर संस्थापिका ताराराणींच्या नगरीत महिलांनी मोठे नाव कमावले आहे. हे योगदान तुम्ही विसरलात का? असा सवाल महिलांनी महाडिक यांना केला. या वक्तव्याबद्दल तुम्ही माफी मागा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.