प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरालगतच्या गांधीनगरसह करवीर तालुक्यातील बारा गावातील नळ पाणी पुरवठा योजनेसह तब्बल 137 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर पाईपलाईन टाकण्याबरोबरच इतर कामांना प्रारंभ होणार आहे. ही माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
गांधीनगर, उचगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नेर्ली तामगाव, वळीवडे, कणेरी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी या बारा गावांत मंजूर निधीतून नळ पाणी योजना राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होत नसल्याने लगतच्या गावांत नागरीकरण वाढले आहे. नोकरी, रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने आलेले लोक शहरालगतच्या या गावात राहत आहेत, स्थायिक होत आहे. एका आकडेवारीनुसार या बारा गावातील नागरीकरणामुळे वाढलेली लोकसंख्या दोन लाखाहून अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे या गावातील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गंभीर बनू लागला आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणी होत होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या प्रश्नी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून योजनेसाठी निधीला मंजुरी देण्याची मागणी केली होती.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार सोमवारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत करवीर तालुक्यातील मौजे गांधीनगरसह बारा गावांत नळ पाणी पुरवठा योजनेस पाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. निधी मंजुरीचा शासन आदेश पारित केला आहे. या बारा गावातील 55 लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या 1765 रूपये इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या 137 कोटी 15 लाख रूपये इतक्या ढोबळ किमतीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे.