तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी करमाळा तालुक्यात कडक मोहिम राबवली आहे. त्यांनी एकाच दिवसात १२ ठिकाणी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून दारू विक्रेत्यांना रंगेहाथ पकडले आहे. यात सालसे, वरकुटे, मिरगव्हाण, खडकेवाडी, देवळाली, केत्तूर नं. २, अर्जुननगर, गौंडरे, झरे येथे धाडी टाकून १२ जणांकडून १० हजार २७० रूपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी १२ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळी अकरा वाजल्यापासूनच पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यास सुरूवात केली. यात सकाळी सव्वा अकरा वाजता सालसे येथे धाड टाकून सतीश अंकुश काळे याच्याकडून ५४० रूपयांच्या देशी संत्रा कंपनीच्या नऊ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. वरकुटे येथे दत्तात्रय किसन वाघमारे याच्याकडून संत्रा कंपनीच्या ७२० रूपयांच्या १२ बाटल्या जप्त केल्या आहेत. मिरगव्हाण येथील गारवा ढाव्याजवळ कालिदास भगवान डिसले याच्याकडून ६६० रूपयांच्या संत्रा कंपनीच्या ११ बाटल्या रात्री आठ वाजता पकडल्या आहेत. याच मिरगव्हाण मधील नवनाथ तुकाराम खाडे याच्याकडे हजार रूपयाची २० लिटर हातभट्टी दारू रात्री आठ वाजता पकडली आहे. खडकेवाडी येथील हॉटेल शिवतीर्थच्या बाजुला प्रताप सुभाष वळेकर (रा. निंभोरे, ह. रा. सावंत गल्ली, करमाळा ) याच्याकडे टँगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या १० बाटल्या सापडल्या आहेत. देवळाली येथील शिवम हॉटेलमध्ये बापू पंढरीनाथ भिसे याच्याकडे ५४० रूपयांच्या टँगो पंच कंपनीच्या नऊ बाटल्या सापडल्या आहेत. तसेच देवळाली येथील नागनाथ हॉटेलच्या बाजुला विकास तात्या शिंदे याच्याकडे ६६० रूपयांच्या टँगो पंच देशी दारूच्या ११ बाटल्या सापडल्या आहेत. केत्तूर नं.२ येथे नागेश प्रभाकर पिंपळे हा पत्र्याच्या आडोशाला हातभट्टी दारू विक्री करत होता. त्याच्याकडे १ हजार रूपये किंमतीची २० लिटर हातभट्टी दारू सापडली आहे. अर्जुननगर येथे हॉटेल स्वागतच्या पाठीमागे भूषण बाळासाहेब फरतडे याच्याकडे संत्रा कंपनीच्या १३२० रूपये किंमतीच्या २२ बाटल्या सापडल्या आहेत. याशिवाय अर्जुननगर येथील हॉटेल मित्रप्रेमच्या पाठीमागे सागर गणेश पायघन (रा. शेलगाव क) याच्याकडे संत्रा कंपनीच्या १२०० रू. किंमतीच्या २० बाटल्या, इंपिरियल ब्लूच्या ३०० रूपये किंमतीच्या दोन बाटल्या, ऑफिर्सस चॉईस कंपनीच्या ४५० रूपये किंमतीच्या तीन बाटल्या, तर झरे येथे पद्मावती हॉटेलच्या बाजूला देशी दारू विक्री करताना सचिव उर्फ सचिन अर्जुन बोराटे याच्याकडे टैंगो पंच कंपनीच्या ४२० रू. किंमतीच्या सात बाटल्या सापडल्या आहेत. या सर्व दारू विक्रेत्यांविरूध्द करमाळा पोलीसात १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील दारूचे सँपल घेऊन अन्य दारू नष्ट करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक कोकणे यांनी एका दिवसात १२ धाडी टाकून करमाळा पोलीस कार्यालयाचा विक्रम मोडला आहे. अशा धाडी टाकल्याची माहिती समजताच दोन नंबर व्यावसायिकांना धडकी भरली आहे. यापुढे कोणत्याही गावात दारू विक्री होत असल्यास तात्काळ करमाळा पोलीसांशी संपर्क साधावा. कोणाचेही नाव उघड केले जाणार नाही व अशा व्यवसायिकांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले आहे.