सिडनी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तब्बल 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एकमेव टी-20 सामना खेळविला जाणार आहे. या दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने मंगळवारी 16 जणांचा संघ जाहीर केला. या दौऱयासाठी पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, हॅजलवूड आणि ग्लेन मॅक्सवेल उपलब्ध होवू शकणार नाहीत, अशी महिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कमिन्स, वॉर्नर, हॅजलवूड आणि मॅक्सवेल यांना यावर्षी होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सुरूवातीच्या काही सामन्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून परवानगी देण्यात आली नाही. मात्र 5 एप्रिलनंतर त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने परवानगी दिली आहे.
पाक दौऱयासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व ऍरॉन फिंचकडे सोपविण्यात आले आहे. बऱयाच वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकमध्ये सामने खेळण्यासाठी येणार असल्याने पाकच्या क्रिकेट शौकिनांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या मालिकेवेळी ऑस्ट्रेलियन संघासाठी खास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल, असे पीसीबीतर्फे सांगण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया वनडे आणि टी-20 संघ- ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍबॉट, ऍगर, बेहरेनडॉर्फ, कॅरे, एलिस, ग्रीन, हेड, इंग्लीस, लाबुशाने, मिचेल मार्श, मॅकडरमॉट, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, स्टोइनीस आणि झाम्पा.