वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना इमरती देवी अवमान प्रकरण चांगलेच भोवणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक रंगली आहे. राज्यात भाजपचे सरकार टिकणार की नाही, हे या पोटनिवडणुकांच्या परिणामांवर अवलंबून आहे. प्रचार शिगेला पोहचला असून कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी बंडखोर काँगेस नेत्या आणि सध्या भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवित असेल्या इमरती देवी यांना ‘आयटेम’ अशा अश्लाघ्य भाषेत संबोधले होते. त्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार सादर केली होती. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा प्रमुख प्रचारक हा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घोषित केला.
या निर्णयामुळे कमलनाथ यांच्या प्रचारावर बंधने येणार आहेत. त्यांना कोणत्याही उमेदवाराने प्रचारास बोलाविल्यास त्या प्रचाराचा सर्व खर्च उमेदवाराला स्वतःच्या पैशाने सोसावा लागणार आहे. या खर्चाचा वेगळा हिशेब सादर करावा लागणार असून उमेदवाराला जेवढी रक्कम खर्च करण्याची कायदेशीर अनुमती आहे त्यात तो जमा केला जाईल. कमलनाथ यांच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्चही उमेदवाराने स्वतःच्या पैशातून भागवायचा आहे.
दर्जा रद्द
निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी कमलनाथ यांना समज दिली होती. तथापि, कमलनाथ यांनी आयोगाच्या आदेशाचा भंग करून आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रचार सुरू ठेवला. याची गंभीर दखल आयोगाने घेतली. त्यानंतर शुक्रवारी आयोगाने त्यांच्या पुढील प्रचारावर बंदी घातली. परिणामी ते आता ही निवडणूक होईपर्यंत ‘प्रमुख प्रचारक’ म्हणून काम करू शकणार नाहीत.









