कमलनाथ यांची प्रकृती बिघडली,
गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल
वृत्तसंस्था/ गुरुग्राम
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (74 वर्षे) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची चाचणी करविण्यात आली असून पहिला अहवला निगेटिव्ह आला आहे. तपासणीत सौम्य संसर्ग आढळून आला आहे. याचमुळे पुन्हा कोरोना चाचणी केली जाणार आहे.
कमलनाथ यांना 2-3 दिवसांपासून सर्दी-खोकला आणि तापाची समस्या जाणवत होती, याचमुळे ते वैद्यकीय तपासणीसाठी मेदांता रुग्णालयात गेले होते. डॉक्टरांनी खबरदारीदाखल त्यांना भरती होण्याचा सल्ला दिला. मेदांताचे वरिष्ठ डॉक्टर्स त्यांची देखभाल करत आहेत. कमलनाथ यांची प्रकृती बिघडल्याची माहिती कळताच त्यांचे पुत्र आणि खासदार नकुल नाथ यांनी दिल्लीत धाव घेतली आहे.
कमलनाथ हे 8 जूनपासून छिंदवाडा या लोकसभा मतदारसंघात तीन दिवसांच्या दौऱयावर जाणार होते. पण अचानकपणे त्यांनी दौरा टाळला होता. यामागे प्रकृती अस्वास्थाचे कारण असल्याचे मानले जात आहे.









