वार्ताहर / कबनूर
राष्ट्रीय ज्युनियर विद्यालयीन क्रीडा स्पर्धेत कबनूर हायस्कूल ज्युनिअर कॉलेजची खेळाडू सुरेखा फराकटे तिने उंच उडी त दुसरा क्रमांक मिळवून रजत पदकावर नाव कोरले. थोडक्यात सुवर्णपदक हुकल्याने तिला रजत पदकावर समाधान मानावे लागले. प्रथमच देश पातळीवर हे पदक मिळवल्याने या यशामुळे तिचे कौतुक होत आहे.
आसाम राज्यातील गुवाहाटी येथे ३६ व्या राष्ट्रीय ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा देश पातळीवरची असल्यामुळे सर्वच राज्यातील खेळाडूंचा समावेश होता. सुरेखा फराकटे ही कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यार्थी असून एक उत्कृष्ट खेळाडू आहे. फराकटे हिची निवड १४ वर्षे वयोगटात उंच उडी क्रीडा प्रकारात झाली होती. सुरेखाने राष्ट्रीय ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन १. ४० मीटर इतकी उंच उडी मारून आपले नाव कोरले. प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक यामध्ये केवळ एक सेंटीमीटरचा फरक पडल्यामुळे तिथेही सुवर्णपदक हुकले.
सुरेखाची निवड छत्तीसगड राज्यातील रायपूर या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन चमकदार कामगिरी केली आहे. पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली होती. तिरूपती येथे झालेल्या आंतर जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेत म्हणून निवड झाली होती. याशिवाय विजयवाडा आंध्रप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला होता. या दरम्यान तिला पदकाने हुलकावणी दिली होती परंतु, यावर्षी झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत तिच्या हातून थोडक्यात सुवर्णपदक हुकले. याची खंत तिला आहे. तिला रजत पदकावरच समाधान मानावे लागले. आतापर्यंत तिला महाराष्ट्र राज्याचे चार वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तिला मिळालेल्या संधीचा फायदा उठवून तिने स्पर्धेत चमक दाखवून आपल्या गावचे व विद्यालयाचे नाव उंचावले.
सुरेखाला क्रीडाशिक्षक सुभाष माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने ती यशस्वी ठरली. आता पुढच्या स्पर्धेत जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट यांच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीत सुवर्णपदक मिळविणार असल्याचे तिने सांगितले आहे. ग्रामीण भागातील खेळाडू मागे नाहीत हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे तिला आणखीनच बळ मिळाले आहे.