डेनेज वाहिन्या मुख्य वाहिन्यांना जोडण्याचे काम सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात विविध भागात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. या डेनेज वाहिन्या मुख्य वाहिन्यांना जोडण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. याकरिता एसपीएम रोडपासून जुन्या धारवाड रोडला जोडणाऱया कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर खोदाईचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा वाहतुकीकरिता बंद आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे विविध रस्त्यांवर बॅरिकेड्स घालून रस्ते बंद करण्यात आले आहेत. काही प्रलंबित रस्त्यांचा विकास आणि अन्य विकासकामे राबविण्यात येत आहेत. एसपीएम रोड ते जुना धारवाड रोड दरम्यानच्या कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर कामासाठी अमृत योजनेंतर्गत 156 कोटी मंजूर झाले आहेत. यामधून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे.
शास्त्रीनगर, हुलबत्ते कॉलनी, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, एसपीएम रोड, शहापूरसह वडगाव, अनगोळ, टिळकवाडी अशा विविध भागात डेनेज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. गल्लोगल्ली घालण्यात आलेल्या डेनेज वाहिन्या मुख्य वाहिनीला जोडण्यात येणार आहेत. मात्र, मुख्य डेनेज वाहिनी अद्याप घालण्यात आली नाही. या वाहिन्या घालण्याकरिता एसपीएम रोड ते जुन्या धारवाड रोडला जोडणाऱया कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. यापूर्वी दोनवेळा या रस्त्याची खोदाई केली होती. आता तिसऱयांदा रस्त्याची खोदाई करण्यात येत असून हा रस्ता वाहतुकीकरिता बंद ठेवला आहे. वारंवार खोदाईमुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले
आहे.









