नवी दिल्ली/प्रतिनिधी
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणारा कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि गुजराचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी राहुल गांधींच्या (rahul gandhi) उपस्थितीत दोघांनी काँग्रेसचा हात हातात घेतला. कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. त्याचा एका जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कन्हैया कुमार काँग्रेस पक्षावर टीका करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत चित्रपट निर्मात्याने कन्हैय्या कुमारची तुलना सरड्याशी केली आहे.
व्हायरल केलेल्या जुन्या व्हिडीओत कन्हैय्या कुमार भारताचा विनाश करण्यासाठी एकटी काँग्रेस पुरेशी होती असं म्हणत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने म्हटलं की, “जर काँग्रेसच वाचली नाही तर देशही वाचणार नाही”. कन्हैया कुमारचा हा व्हिडीओ ट्विटरला शेअर करताना चित्रपट निर्माता अशोक पंडित (Ashoke Pandit Indian filmmaker) यांनी ‘सरड्याचे बदलते रंग’ असं म्हटलं आहे.
अशोक पंडित यांनी कन्हैया कुमारवर टीका करताना म्हटलं आहे की, “राहुल गांधी जेव्हा बाहेर काढतील तेव्हा हा भाजपात प्रवेश करु शकतो. आश्चर्य वाटू देऊ नका”. अशोक पंडित यांच्या ट्वीटवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.