वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कन्वर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड यांना इलेक्ट्रिक बस संदर्भातील खरेदीचे कंत्राट नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे कंत्राट असल्याची माहिती कन्वर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड यांनी दिली आहे.
कंपनी आगामी काळात 5 हजार 500 कोटी रुपयांच्या 5 हजार 580 इल क्ट्रिक बसेस खरेदी करणार आहे. यामध्ये 130 डबल डेकर बसेसचा समावेश असणार आहे. ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱया एनर्जी एफियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांची ही सरकारी कंपनी आहे. या मागणीच्या माध्यमातून देशातील 5 प्रमुख शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये बेंगळूर, दिल्ली, सुरत, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांचा प्राथमिक टप्प्यामध्ये समावेश असल्याचे कळते. या वर्षाच्या जुलैपर्यंत इलेक्ट्रिक बसचा पहिल्या टप्प्यातील पुरवठा केला जाणार असून त्याच महिन्यांमध्ये या बसेस रस्त्यावर उतरवल्या जातील असे सांगितले जाते.









