संस्कृतमध्ये स्त्रियांची थोरवी सांगणारे अनेक श्लोक आहेत. त्यातीलच पुढील एक आहे. सोम: शौचं ददौ तासांत गंधर्वांश्च शुभा गिराम्। अग्नि: सर्वांगकान्तित्वं तस्मान्निष्किसमा स्त्रिय:।। अर्थ:- सोन्याने स्त्रीला पवित्रता दिली, गंधर्वांनी शुभ वाणी दिली, अग्नीने अंगकांती दिली म्हणून स्त्रिया सोन्यासारख्या आहेत. सोम म्हणजे चंद्र व यज्ञातील वनस्पती. दोन्हीही शुद्धता देतात. गंधर्व ही देवलोकातील मधुर आवाज असणारी अतिमानवी योनी. अग्नी तेजस्वी असतो. त्याने स्त्रियांना सोन्यासारखी कांती दिली. सोनेही तेजस्वी असते. ते अग्नीत टाकले तरी अधिकच कांतिमान दिसते. म्हणजे कितीही संकटे आली तरी, स्त्रिया नष्ट न होता दिव्यातून अधिक कांतिमान होऊन उजळतात. जसे सीतेलाही अग्निदिव्य करावे लागले, त्यातून ती तावून सुलाखून बाहेर पडली. तिचे पावित्र्य अधिकाधिक उजळत गेले. म्हणून कवी स्त्रिया सोन्यासारख्या असतात असे म्हणतो. पण अशाच सोन्यासारख्या स्त्रियांचे विवाहात कन्यादान का बरे केले जाते? कशी बरे ही प्रथा पडली असावी असा प्रश्न अनेकदा मनात येत होता. त्यासंबंधी एक माहिती वाचनात आली आणि कळले की, शास्त्रापेक्षाही रूढी कशी वरचढ ठरते ते! रामायणातील ही कथा आहे. रामाने शिवधनुर्भंग केल्यावर राजा जनकाने ‘सीता रामाला देत आहे’! अशा अर्थाने मंत्रोच्चारपूर्वक जल हातात घेऊन ताम्हनात पाणी सोडले. त्याचवेळी राम आणि सीता यांच्यावर पुष्पवर्षाव झाला. देव, ऋषी यांनी ‘उत्तम’ असे म्हणून आशीर्वाद दिले. त्यावेळी असा मंत्र आहे-एवं दत्त्वा सुतां सीतां मंत्रोदकपुरस्कृताम्। याचा अर्थ ‘समंत्रक व उदकपूर्वक सीता रामाला देऊन’ असा आहे. परंतु काही भाषांतरकारानी त्याचा अर्थ ‘सीता नामक कन्येचे दान करून’ असा लावला आहे. त्यामुळे एखादे दान देताना हातात पाणी घेऊन ते मंत्रोच्चार पूर्वक घेणाऱयांच्या, ब्राह्मणाच्या हातावर सोडावे व दानाचा संकल्प करावा असा घेतला गेला. परंतु जनकाने रामायणात ‘सीतेचे दान केले’ असा कुठेही उल्लेख नाही. सीता ही भूमिकन्या होती. पितृपद जनकाकडे होते. म्हणून त्याने सीतेच्या विवाहाच्या वेळी ‘जो शिवधनुष्याला दोरी लावू शकेल, त्यालाच सीता पत्नी म्हणून द्यायची’ असा त्याचा निर्धार होता. सीतेचे दान करावे अशी कुठेच कल्पना नाही. त्याच देण्याला पुढे ‘कन्यादान’ हे बिरुद लावले गेले. त्यानंतर क्षत्रिय राजघराण्यात राजकन्या एखाद्या राजपुत्राला देताना ती सत्कारपूर्वक अर्थात ‘सर्वालंकारयुक्त’ अशी करूनच दिली जात असे. त्यालाच पुढे ‘सालंकृत कन्यादान’ असे म्हटले जाऊ लागले. नंतर तो विधीच बनून गेला. वराला सत्कारपूर्वक कन्या देण्याच्या संकल्पनेचे पुढे एका निकृष्ट दान प्रक्रियेत रूपांतर झालेले दिसते. त्यामुळे ‘दान’ शब्दाने नवयौवना, युवतींची ‘दानभोग्या’ म्हणून संभावना केल्यावर तिची आधीची सत्कारयुक्ता ही प्रति÷ाच संपुष्टात आली तर नवल ते काय?
Previous Articleअनिरुद्ध व उषेचा शृंगार
Next Article मनोरूग्ण तरुणाने मंगळवार पेठेत सात गाड्या फोडल्या
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








