भारतात मधुमेहींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तरुणांनाही मधुमेह जडू लागला आहे. मधुमेह झाल्यानंतर पथ्यपाणी सांभाळावं लागतं. रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी बरेच काही करावं लागतं. दररोज ठराविक वेळेत न्याहरी केल्यास रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहू शकतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. नेमकं काय सांगतं हे संशोधन? पाहू या.
मधुमेहींनी सकाळी साडेआठ वाजण्याआधी न्याहरी करून घ्यायला हवी, असं हे संशोधन सांगतं. या संशोधनासाठी अमेरिकेतल्या 10,575 लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळांची माहिती घेण्यात आली. सकाळी साडेआठ वाजण्याआधी न्याहरी केल्यास रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहू शकतं, असं या संशोधनातून समोर आलं. मधुमेहींनी दिवसाची सुरुवात प्रथिनं,आरोग्यदायी फॅट्स, फायबर आणि पूर्णधान्य युक्त नाश्त्याने करायला हवी. यासाठी आहारात दूध, दही, अंडी, ओट्स, दलिया, फळं यांचा समावेश करायला हरकत नाही. यासोबतच मधुमेहींनी सकाळी दूध प्यायल्यास रक्तातली साखर दिवसभर नियंत्रणात राहू शकते, असंही हा शोध सांगतो. म्हणूनच मधुमेह झाल्यानंतर वेळच्यावेळी खाणं खूप आवश्यक आहे.









