प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी-गोकाक रोडशेजारील गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. गटारीमध्ये पाणी साचून राहिल्याने तसेच काम रखडल्याने रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती. सध्या सण असल्याने तो संपल्यानंतर काम सुरू करण्यात येईल, असे सांगून गटारीमधील साचलेले पाणी भरून काढण्यात आले. कणबर्गी परिसरात विविध विकासकामे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येत आहेत. मात्र येथील गटारीचे बांधकाम सुरू असतानाच कंत्राटदाराने काम बंद ठेवले. परिणामी बांधकाम रखडले आहे. काही ठिकाणी लोखंडी सळय़ा घालण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांच्या घरासमोर पाच फूट रुंदीची चर खोदली आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना साकवाचा आधार घ्यावा लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी लाकडी फळय़ा घातल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना व वृद्धांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे. सदर गटारीचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून अधिकारी व कंत्राटदाराचे लक्ष वेधले आहे. वृत्ताची दखल घेऊन कंत्राटदाराने मंगळवारी कणबर्गी परिसरात काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. सदर काम संक्रांतीनंतर पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. पण खोदण्यात आलेल्या चरीमध्ये सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. परिणामी लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर पाणी जाण्यासाठी मार्ग काढावा, अशी सूचना ग्रामस्थांनी केली. सदर गटारीचे बांधकाम करण्यात येत असल्याने पाणी काढता येणार नाही. त्यामुळे गटारीमध्ये साचलेले पाणी टँकरमध्ये भरून नेण्यात आले. त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. पण संक्रांत संपताच दोन दिवसात काम पूर्ण करावे, अशी सूचना कंत्राटदाराला करण्यात आली.









