राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणार असल्याची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी परिसरातील शेती जमिनीमध्ये वसाहत योजना राबविण्यासाठी 130 एकर शेत जमीन बुडाने ताब्यात घेतली आहे. मात्र या योजनेतील जागेत काही घरे बांधण्यात आली असल्याने योजनेची अंमलबजावणी करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता घरे वगळून नवा आराखडा तयार करण्यात आला असून, मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.
कणबर्गी परिसरात वसाहत योजना राबविण्यासाठी बुडाने 2007 मध्ये भुसंपादनासाठी नोटीस बजावली होती. यापैकी काही शेतकऱयांनी आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतल्याने योजना राबविण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे तब्बल 13 वर्षानंतर भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, सहा महिन्यापूर्वी जागेचा ताबा बुडाने घेतला आहे. तसेच या ठिकाणी काही शेतकऱयांनी योजना राबविण्यास बुडाला संमतीपत्र दिले होते. पण काही शेतकऱयांनी 100 रूपयाच्या स्टँम्प पेपरवर जागेची विक्री केली होती. त्यामुळे या जागेत काही नागरीकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे घरे असलेल्या जागेचा ताबा घेण्यात बुडाला अडचण निर्माण झाली होती. काही इमारत मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन इमारती असलेल्या जागेचा ताबा घेण्यास स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे योजना राबविण्यास अडथळा निर्माण झाला आहे. योजना क्रमांक 61 च्या जागेत 3 ठिकाणी घरे बांधण्यात आली असल्याने या जागेचा ताबा घेण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे याबाबत बुडाच्या बैठकीत चर्चा करून स्थगिती घेतलेली आणि न्याय प्रवि÷ असलेल्या जागा वगळून योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच योजनेचा आराखडय़ात बदल करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे बुडाच्या अभियंत्यांनी योजनेच्या आराखडय़ात बदल केला आहे. घरी असलेली जागा वगळून नविन आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच 25 एकर जागेबाबत शेतकऱयांनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयातून भू संपादनास स्थगिती घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर जागेमध्ये योजना राबविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र सध्या तयार करण्यात आलेल्या आराखडय़ात या जागेचा समावेश करण्यात आला आहे. पण न्यायालयाच्या निकालानंतरच जागेचा विकास केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदर आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या आराखडय़ाला मंजुरी मिळाल्यानंतर सदर योजना मार्गी लागणार आहे.









