कणकवली / वार्ताहर:
गणेशोत्सवाच्या पहिल्याच रात्री कणकवलीला चोरट्यांचा तडाखा बसला. शहरातील तब्बल सहा दुकानगाळे चोरट्यांनी फोडले. यातील काही घटना शुक्रवारी रात्री ११.३० वा. तर काही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या. यात तीन दुकानांमध्ये मिळून जवळपास ३० हजार रुपये चोरीस गेले आहेत. चोरट्यांनी फोडलेल्या दुकानांमध्ये कापड दुकान, फोटो स्टुडिओ, वैद्यकीय साहित्य विक्री दुकान, चार्टर्ड अकाऊंट्सचे कार्यालय, दवाखाना, इलेक्ट्रिकल दुकान या सहा दुकानांचा समावेश आहे. तर चोरट्यांनी कणकवली बाजारपेठ येथे उभ्या असलेल्या एका दुचाकीचे काही पार्टही चोरले. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक सूरज चव्हाण, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात श, कॉन्स्टेबल किरण मेथे आदींच्या पथकाने पंचनामा केला.









