वार्ताहर / कडोली
कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात रोहयोतून काम केलेल्या कामगारांना दिलेले कमी मजुरीचे प्रकरण शेकत असतानाच तेव्हापासूनची तब्बल पाच आठवडय़ांची अन्य मजुरीही अद्याप जमा झाली नसल्याने या मागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न कामगारांतून उपस्थित केला जात आहे. मजुरी जमा झाली नसल्याने सर्वसामान्य कामगारांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे.
कडोली ग्रा. पं. क्षेत्रातील कडोली, जाफरवाडी, देवगिरी आणि गुंजेनहट्टी गावांतील सुमारे दोन हजारहून अधिक कामगारांना रोजगार हमी योजनेतून काम देण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाने कडोली परिसरातील शेती व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असून शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सर्व शेतमजूर आता रोहयोकडे वळले आहेत. गेले दोन महिने कडोली ग्राम पंचायतीने या सर्व रोहयो कामगारांना कामे देऊ केली आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी तालुका पंचायत रोहयोच्या नूतन अभियंत्यांनी सदर कामगारांना 300 रुपयांऐवजी केवळ 110 रुपये मजुरी देऊन कामगारांची थट्टाच केली आहे. कमी वेतन घातल्याप्रकरणी कामगारांनी ग्रा. पं.समोर ठिय्या आंदोलन छेडले होते. परिणामी ग्राम पंचायतीशी संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले. त्यानंतर बेळगाव लोकायुक्तांनी लक्ष घालून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. कामाचे मोजमाप न करता कमी मजुरी घातलीच कशी? याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना दिले. शिवाय ग्रा. पं. कार्यालयात स्वतः लोकायुक्त हजर राहून कागदपत्रांची पाहणी करीत असल्याने संबंधितांत खळबळ माजली आहे.
ग्रा. पं. सदस्यांचे दुर्लक्ष
कडोली ग्रा. पं. क्षेत्रात रोजगार हमी योजनेंतर्गत रोज 5 ते 6 लाख रुपयांची कामे उरकली जातात. एवढय़ा मोठय़ा रकमेची कामे रोज होत असताना ग्राम पंचायत सदस्य याकडे कितपत लक्ष देतात? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोहयोसाठी दैनंदिन खर्च घातला जातो काय? सर्वसामान्य गरीब महिलांचे जॉबकार्ड करण्यासाठी त्यांना किती खर्च येतो? गरीब नागरिकांना आपली कितपत मदत होते? याची शहानिशा करणे गरजेचे आहे. आता रोहयोतून कमी मजुरी हे प्रकरण इतके गंभीर असताना ग्रा. पं. सदस्य मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तेव्हा यात काही तरी गौडबंगाल आहे काय? याची पाहणी ग्रा. पं. सदस्यांनी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांतून केली जात आहे.









