प्रतिनिधी/ बेळगाव
पंडित बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या 18 व्या पुण्यतिथीनिमित्त सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात संगीत मैफल कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी स्नेहा राजुकर, रोहिणी गणफुले, राजप्रभू धोत्रे, महेश कुलकर्णी, गुरुराज कुलकर्णी व शुभदा कुलकर्णी यांच्या हस्ते पंडित बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कलाकारांचे जयश्री कडलास्कर यांनी पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी नम्रता कुलकर्णी यांनी गणेश आराधना करून संगीत मैफिलीस सुरुवात केली. त्यानंतर अनिता पागद, मंजुश्री खोत, विजय बांदिवडेकर यांनी ‘भय इथले संपत नाही’, ‘रात्रीचा समय सरूनी’, ‘करवीर निवासिनी’, ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ आदीसहीत एकापेक्षा एक सरस गाणी आणि भावगीते, भक्तीगीते सादर करून मैफिलीत रंगत आणली. याप्रसंगी त्यांना तबलासाथ उद्धव माने, विनायक नाईक, पेटीवर योगेश रामदास, पखवाज सौंदत्त माने यांनी उत्तमरित्या साथ दिली.
मैफिलीत उपस्थित गायकांनी आपल्या सुमधूर आवाजाने आणि तेवढय़ाच ताकदीने वादकांनी दिलेल्या साथीने रसिकांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवले. त्यानंतर शांताराम हेगडे यांचा एकल गायनाचा कार्यक्रम झाला.
संवादिनी वादन
भोपाळ येथून आलेले संवादिनी वादक अमन मलक यांचा यावेळी संवादिनी वादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांना तबलासाथ नारायण गणाचारी यांनी केली. मलक यांनी आपल्या उत्कृष्ट अशा संवादिनी वादन शैलीतून उपस्थित संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले.
यावेळी सरस्वती वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी, संगीतप्रेमी, मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शोभा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.









