प्रतिनिधी / बेळगाव
शरीर साक्षात परमेश्वर, शरीर हे दिव्य अनुभव आहे, शरीराचा प्रत्येक भाग दिव्य आहे आणि रक्तदान हे महादान आहे, असे मनी धरून आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून आरंभ ढोल ताशा पथकाच्यावतीने रक्तदान करण्यात आले. रक्तदान शिबिर रविवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेत चिंतामणराव स्कूल, कचेरी गल्ली-शहापूर येथे पार पडले.
कोरोनाच्या या महामारीत लोक हॉस्पिटलमध्ये येण्यास घाबरत आहेत. कारण सर्व हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे आपल्यालाही कोरोनाची लागण होईल या भीतीने रक्तदाता मागे फिरत आहेत. मात्र, बेळगावातील आरंभ ढोल ताशा पथकाने ही समस्या जाणून घेऊन रक्तदान केले. त्यामुळे केएलई ब्लड बँकेतर्फे विठ्ठल माने यांनी आरंभ ढोल ताशा पथकाचे आभार मानले.
यावेळी 95 जणांनी रक्तदान केले. संकलित रक्त डॉ. प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलच्या ब्लड बँकेला दिले. यावेळी ढोल, ताशा पथकाचे सर्व वादक उपस्थित होते.









