प्रतिनिधी/ पणजी
कचऱयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे ही काळाची गरज आहे. कचऱयाकडे समस्या म्हणून न पाहता संसाधन म्हणून पहा काही प्रगत राष्ट्रानी सुक्या कचऱयापासून विद्युत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. ओल्या कचऱयापासून घरोघरी खत तयार होऊ शकते. कचऱयाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत बांदोडा येथील संजीवन सोसायटी फॉर युथ डेवलपमेंट या संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादातून व्यक्त झाले.
या परिसंवाद पत्रकार प्रमोद आचार्य, राजू नायक, मिनरल फाऊंडेशनचे पराग रांगणेकर, लेखिका ज्योती कुंकळकर, संजीवच्या आशा सावर्डेकर, गुलाब बोरकर उपस्थित होत्या.
राजू नायक म्हणाले की, आमच्या मागच्या पिढय़ांनी कधीच प्लास्टिकचा वापर केला नाही. आजच्या पिढीला प्लास्टिकाशिवाय जगणे असह्य वाटते. बाजारात जाताना कापडी वा कागदी पिशव्या वापरा. प्रमोद आचार्य म्हणाले, की एके काळी ग्रामीण भागात कचरा हा शब्दच प्रचलित नव्हता. कारण कचरा विल्हेवाटीचे शंभर पर्याय लोकांसमोर असायचे. हा प्रश्न काही रात्रीत तयार झाला नसून लोकांनी तो स्वतः तयार केला आहे.
मिनरल फाऊंडेशनचे पराग रांगणेकर म्हणाले, कमी शिकलेले असूनही ग्रामीण भागातले लोक कचऱयाबाबतीत सजग आहेत. परंतु उच्चशिक्षित असूनही शहरी भागातर्फे लोक अनास्था दाखवत आहेत. कचरा प्रश्न सोडवायचा असल्यास लहान मुलांच्या सवयी बदलायला हव्यात.
पर्यावरणाशी संबंधित कार्यक्रमावर काम करणाऱया गुलाब बोरकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रस्तावना आणि स्वागत आशा सावर्डेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कुंकळकर यांनी केले तर आभार श्रद्धा परूळेकर यांनी मानले.









