मडगाव पालिकेच्या स्वच्छता समितीकडून अधिकाऱयांकडून निर्देश, पंधरवडय़ात पुन्हा आढावा बैठक घेणार
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेच्या स्वच्छता समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घरोघरी कचरा उचल, सोनसडा कचरा प्रकल्प तसेच स्वच्छतेशी संबंधित अन्य विषयांवर चर्चा करून आढावा घेण्यात आला व ज्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे त्या जाग्यावर घालण्याचे निर्देश समितीकडून संबंधित अधिकाऱयांना देण्यात आले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष असलेले नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनी दिली.
बार्रेटो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला समितीचे अन्य सदस्य नगरसेवक तसेच नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो तसेच तांत्रिक व सेनिटरी विभागांचे अभियंते, अधिकारी उपस्थित होते. ज्या सूचना आणि निर्देश स्वच्छता समितीकडून देण्यात आले आहेत त्यासंदर्भात काय पावले उचलण्यात आली आहेत त्याची माहिती तसेच खातरजमा करून घेण्यासाठी पंधरवडय़ात पुन्हा आढावा बैठक घेतली जाणार आहे, असे नगरसेवक बार्रेटो यांनी सांगितले.
घरोघरी कचरा उचल करण्यासंदर्भात सध्या कार्यरत असलेल्या बापू आणि ग्लोबल या दोन्ही एजन्सींना एका महिन्याची मुदतवाढ दिली गेली असून यासंदर्भात निविदा प्रक्रिया त्वरित मार्गी लावण्याची सूचना स्वच्छता समितीने केली. कचरा उचल करणाऱयांना हातमोजे व अन्य साहित्य पुरविण्याकडे लक्ष देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
कचऱयातून वाहणाऱया पाण्यासाठी टाकी उभारा
सोनसडय़ावर दैनंदिन 10 ते 15 टन सुक्या कचऱयाचे बेलिंग करण्यात येते. सदर सुका कचरा नंतर परराज्यातील सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात येतो, असे अधिकाऱयांनी नजरेस आणून दिले. दैनंदिन गोळा होणाऱया ओल्या कचऱयावर प्रक्रिया होत नसून येथील प्रकल्पाची यंत्रणा नादुरुस्त स्थितीत आहे. सदर ओल्या कचऱयातून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहून बाहेर पडत असल्याने त्याची योग्य प्रकारे साठवण करण्यासाठी टाकी उभारावी, असे निर्देश अध्यक्ष बार्रेटो यांनी दिले.
तसेच सोनसडा प्रकल्प इमारतीला भिडून असलेला मातीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची निविदा काढली होती. परंतु हे काम रेंगाळले आहे. आता नव्याने सुधारित निविदा काढून रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे अन्यथा पावसाळ्यात कचरावाहू ट्रक प्रकल्पात खाली करण्याच्या बाबतीत पुन्हा अडचणींचा सामना करावा लागेल. कारण पावसाळय़ात तो निसरडा बनत असतो, याकडे बार्रेटो यांनी अभियंत्यांचे लक्ष वेधले.
नादुरुस्त कचरावाहू वाहने दुरुस्त करा
जुन्या बाजारात असलेल्या पालिकेच्या गॅरेजमधील जे ट्रक व वाहने कचरा वाहून नेण्यासाठी वापरली जातात त्यातील काही नादुरुस्त असल्यास ती त्वरित दुरुस्त करून मार्गावर आणावीत व जी दुरुस्त करणे शक्य नाही ती भंगारात काढावीत, अशा सूचना करण्यात आल्या. सोनसडय़ावर ओला कचरा वाहून नेणाऱया ट्रकांमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यांवर सांडू नये म्हणून ट्रकांना टाकी बांधून हे सांडपाणी त्यात साठविण्याची तरतूद करावी. तसेच प्रत्येक ट्रक कचरा खाली केल्यानंतर पाण्याने धुवून दुसऱया फेरीसाठी पाठविण्याची सक्ती करावी, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सुका कचरा वाहून नेताना ट्रकावर टाकलेल्या गोण्यांवर एक कामगार बसून प्रवास करत असतो. हा प्रकार धोकादायक असल्याने तो त्वरित थांबविण्याचे निर्देश समितीने यावेळी दिले. पालिका क्षेत्रातील नाले, गटारे पावसाळ्यापूर्वी साफ करावीत. तसेच जेथे मोठे नाले आहेत तेथे पूरसदृश स्थिती उद्भवते. तेथे त्वरित मदत पुरविण्यासाठी मडगाव व फातोर्डात दोन पथके तैनात करावीत, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
नगराध्यक्षांनी बापू एजन्सीची बाजू उचलून धरल्याने काही नगरसेवक संतप्त
स्वच्छता समितीच्या बैठकीला बहुतांश वेळा नगराध्यक्ष उपस्थिती लावत नसतात. कारण या समितीने घेतलेल्या निर्णयांवर नंतर नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीकडून तसेच पालिका मंडळाकडून अंतिम निर्णय घेतले जातात. मात्र सोमवारच्या स्वच्छता समितीच्या बैठकीला नगराध्यक्ष शिरोडकर यांनी उपस्थिती लावली व काही सूचना मांडल्या. मात्र त्यांनी घरोघरी कचरा उचल करणारी बापू एजन्सी ही चांगली काम करत असल्याचे सांगून सदर एजन्सीची तळी उचलून धरल्याने आणि ही एजन्सी जर काम सोडून गेली, तर लोक नगरसेवकांची चपलांनी तोंडे फोडतील, असे वक्तव्य केल्याने काही नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे.









