पुरवणी परीक्षेवेळी मिळणार संधी : शिक्षणमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 जून ते 4 जुलै या कालावधीत राज्यात दहावी परीक्षा होणार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. परीक्षा काळात कंटेन्मेंट झोनमध्ये येणाऱया भागांमध्ये दहावी परीक्षा घेण्यात येणार नाही. या भागातील विद्यार्थ्यांना नंतर होणाऱया पुरवणी परीक्षेवेळी रिपीटर ऐवजी नवे विद्यार्थी म्हणून गृहित धरण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
स्थलांतरित कामगारांची मुले, समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहांमधील विद्यार्थी, वसती शाळांमधील विद्यार्थ्यांना ते राहात असलेल्या भागातील परीक्षा केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना नव्याने हॉल तिकीट देण्यात येणार आहे. 4 जुलै रोजी परीक्षा संपल्यानंतर लागलीच मूल्यमापन प्रक्रिया सुरू होईल. 31 जुलैपूर्वी मूल्यमापन पूर्ण करून निकाल जाहीर करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असे ते म्हणाले.
टीईटी 5 जुलैऐवजी 12 जुलै रोजी
यापूर्वी 5 जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्या दिवशीच सीटीईटी होणार असल्याने राज्यातील उमेदवारांच्या दृष्टीने टीईटी 12 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
शाळा सुरू करण्याबाबत आठवडाभरात निर्णय
प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा केव्हापासून सुरू कराव्यात याबाबत पुढील आठवडय़ात निर्णय घेतला जाईल. लवकर शाळा प्रारंभ करू नये, अशी मागणी पालकांची आहे. मात्र सर्व दृष्टीकोनातून चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल.#