मोटरसायकल चालक जखमी ग्रामस्थांनी केला रास्ता रोको
प्रतिनिधी / सरवडे
देवगड- निपाणी राज्य मार्गावर सोळांकूर येथे थेट पाईपलाईनची पाईप घेऊन चाललेल्या कंटेनरने मोटारसायकल स्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेल्या शारदा शंकर पाटील वय(५६) या महिला जागीच ठार झाल्या. तर मोटरसायकल चालक सेवानिवृत्त फॉरेस्ट रेंजर शंकर शामराव पाटील हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको करून थेट पाईपलाईनच्या ठेकेदाराचा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करून संतप्त भावना व्यक्त केल्या. गेल्या तीन वर्षापासून हा मार्ग मृत्युचा सापळा बनला असून वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थानी केला.
सोळांकूर गावातून काळम्मावाडी – कोल्हापूर थेट पाईप लाईनचा कंटेनर पाईप घेऊन मुदाळ तिट्याकडे चालला होता. गावातील मुख्य चौकातुन कंटेनर जात असताना सेवा निवृत्त वनक्षेत्रापाल शंकर पाटील हे पत्नी शारदा पाटील यांना घेऊन स्कूटीवरून शेताकडे चालले होते. दरम्यान भरधाव जाणाऱ्या कंटेनर चालकाने स्कूटीला धडक दिली. त्यामध्ये सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल शंकर पाटील हे जखमी झाले तर त्यांची पत्नी शारदा पाटील या कंटेनरच्या चाकाखाली पडल्या. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. यावेळी सोळांकूर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर चालक पळून गेला यावेळी ग्रामस्थानी संतप्त भावना व्यक्त करत राज्यमार्गवरील वाहतूक बंद केली.
गेल्या तीन वर्षापासून थेट पाईप लाईनचे आणि देवगड निप्पाणी राज्यमार्गाचे काम सुरु असल्याने या मार्गांवर अनेक अपघात झाले आहेत. रस्त्याच्या धुळीने तर संपूर्ण गावालाच श्वासाचा त्रास सुरु झाला आहे. लहान मुलांना तर या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी आणि थेट पाईप लाईनचा ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकामं विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा याच बरोबर आमचे रक्त पडले तरी चाललं मात्र गावातून थेट पाईप लाईन टाकू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक उदय डुबल, उपनिरीक्षक एम एच शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील, सुरेश मेटिल यांनी भेट देवून ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र तीन तास ग्रामस्थांनी रस्त्यावर ठाण मांडला होता. पहिल्यांदा दोन अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्याशिवाय वाहतूक सुरु करू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थ्यांनी दिला. यामुळे वहातुक ठप्प होवून सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.