प्रतिनिधी / वास्को
मुरगाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या कंटेनमेंट झोनमधून लोकांच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्याने कंटेनमेंट झोनची उपाययोजना टाळण्याचा प्रयत्न आता प्रशासन करू लागले आहे. या दृष्टीने नवीन उपाययोजना म्हणून पॉझिटिव्ह सापडणाऱया कुटुंबालाच होम कॉरन्टाईन करण्यात येणार असून त्या कॉरन्टाईन कुटुंबावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक नगरसेवकावर आलेली आहे. शुक्रवारी वास्कोतील रविंद्र भवनात मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नगरसेवकांनीही सहकार्याची तयारी दर्शवलेली आहे. आजपासूनच या निर्णयाची कार्यवाही होणार आहे.
मुरगाव तालुक्यात सध्या मांगोरहिल, बायणा, खारवीवाडा व झुआरीनगर या भागात कंटेनमेंट झोन अस्तित्वात असून सडय़ावरील भाग कंटेनमेंटमधून मुक्त करण्यात आलेला आहे. मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनला महिना उलटलेला असून खारवीवाडा भागातील कंटेनमेंट झोनला जवळपास महिना होत आला आहे. बायणातील कंटेनमेंट झोनलाही महिना उलटलेला आहे. या सर्व कंटेनमेंट झोनमधून नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. अनेक गैरसोयी व आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाविरूध्द तीव्र नाराजी पसरलेली असून आतापर्यंत अनेकवेळा या नाराजीचा प्रत्यय आलेला आहे. मांगोरहिल भागातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी तर येत्या दि. 2 पर्यंत कंटेनमेंटमधून मुक्त न केल्यास बेमुदत उपोषणाचा ईशाराही देण्यात आलेला आहे. प्रत्येक कंटेनमेंट झोनमधून व्यक्त होऊ लागलेल्या लोकांच्या नाराजीची दखल घेत यापुढे नवीन कंटेनमेंट झोन लागू करणे टाळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होऊ लागल्याचे दिसत आहे. कंटेनमेंट झोनचा व्याप सांभाळण्याचा ताण प्रशासनला जड होऊ लागलेला आहे.
कंटेनमेंट झोनचा प्रश्न सोडवण्यासाठी व ही समस्या वेगळय़ा पध्दतीने हाताळण्याच्या उद्देशाने मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी शुकवारी संध्याकाळी वास्कोतील रविंद्र भवनात पालिका मुख्याधिकारी अरविंद बुगडे, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, पालिका क्षेत्रातील बहुतेक सर्व नगरसेवक, शासकीय अधिकारी व पोलीस अधिकाऱयांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत उपजिल्हाधिकाऱयांनी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने यापुढे शक्यतो कंटेनमेंट झोन करण्याचे टाळून दाट लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी नवीन उपाययोजना हाती घेण्यात येईल सांगितले. त्यासाठी नगरसेवकांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या नवीन उपाययोजनेनुसार ज्या लोक वस्तीत एखादय़ा कुटुंबातील कुणी सदस्य कोविड पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आल्यास, त्या कुटुंबाला घरातच कॉरन्टाईन करण्यात येईल. एकापेक्षा अनेक घरातही कोरोना बाधीत आढळल्यास त्या सर्व कुटुंबांना त्यांच्या घरातच कॉरन्टाईन करण्यात येईल. तशा प्रकारचे स्टिकर्स त्या घराच्या दरवाजावर लावण्यात येईल. त्यामुळे कंटेनमेंट झोनचा इतरांना होणारा त्रास वाचेल. एखादय़ा दाट वस्तीत एखादय़ा कुटुंबाला होम कॉरन्टाईन करणे शक्य नसल्यासच वस्ती कॉरन्टाईन करण्यासंबंधीचा अपवादात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, ज्या कुटुंबांना होम कॉरन्टाईन करावे लागेल, त्या कुटुंबांवर स्थानिक नगरसेवकांना लक्ष ठेवावे लागेल. ती कुटुंबे कॉरन्टाईन नियमांचा भंग करणार नाही याची खबरदारी नगरसेवकांना घ्यावी लागेल असे या बैठकीत ठरले. मुरगावच्या उपस्थित नगरसेवकांनीही या उपक्रमाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवलेली आहे. मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी कंटेनमेंट झोन न करता त्या त्या कुटुंबांना घरातच कॉरन्टाईन करण्याची कल्पना योग्य आहे. प्रयत्न केल्यास हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. मात्र, काही दिवस प्रायोगीक तत्वावर हे काम करायला हवे. त्यामुळे काही अडचणी असल्यास त्या उघडकीस येतील. आमचे नगरसेवक पूर्वीपासूनच हे काम करीत आहेत. ते सहकार्य करतील. कायदय़ाचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूध्द कारवाईही होईल. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे कंटेनमेंट झोनची डोकेदुखी बऱयाच प्रमाणात कमी होईल असे मत व्यक्त केले.









