शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून नूतन ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांचा केला सत्कार
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
येथील मराठी प्राथमिक शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून नूतन ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांचा सत्कार व शिवजयंती असा संयुक्त कार्यक्रम शाळेच्या आवारात मोठय़ा उत्साहात शुक्रवारी पार पडला. यावेळी शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मोहन भैरटकर होते.
व्यासपीठावर सत्कारमूर्ती ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य दादासाहेब भदरगडे, यल्लोजी पाटील, बंदेनवाज सय्यद, मल्लेशी बुंडेनूर, सद्याप्पा राजकट्टी, आनंद पम्मार, शमीमबानू पठाण, कौसरजहाँ सय्यद, योगिता पठाणे, भरमा पाटील, सुचिता कोवी, फकिरव्वा बेळगावी, शकुंतला सिंग, मेनका कोरडे, वंदना चव्हाण, दिपा पम्मार, सुवर्णा लक्कण्णावर, कंग्राळी बुद्रुक सीआरपी शंकर कुलकर्णी, निवृत्त मुख्याध्यापिका एस. एल. किल्लेकर, कन्नड शाळा मुख्याध्यापक, दोडमनी माध्यमिक विद्यालयाचे बी. एस. पाटील, गर्ल्स हायस्कूलचे गजानन खांबले आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकमध्ये सहशिक्षक पी. ए. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून मराठी शाळेच्या नवीन इमारत नूतनीकरणाच्या माध्यमातून शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी माजी विद्यार्थी देणगीदार, व इतरांच्या सहकार्यातून शाळेची इमारत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, उपाध्यक्ष अनिल पावशेसह सदस्य व सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मोहन भैरटकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. शाळा सुधारणा सदस्य विष्णू पाटील यांनी श्रीफळ वाढविले.
शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी हलवा पाळणा पाळणा, जगदंब जगदंब, जय शिवाजी, जय भवानी ही शौर्य गीते समुहाने शिवाजी महाराज व मावळे यांच्या रंगभूषेमध्ये सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, अशा घोषणा देऊन सारा परिसर शिवमय करून सोडला, यावेळी अफझलखानाचा वध हे नाटकही सादर करून शिवाजी महाराजांच्या शौर्य व पराक्रमी आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी भावना राजू पावशे व साधना धामणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. साधना धामणेकर हिने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक अक्षरांचा अर्थ सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली.
यावेळी डिजिटल इंडियाचे संपादक कामाण्णा चौगुले म्हणाले, मराठी शाळा बांधणे काही अवघड नाही. आज प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करण्याची फॅशन आली आहे. त्यात बदल करून प्रत्येक आजी व माजी विद्यार्थ्यांनी वाढदिवसाचा खर्च जर शाळेच्या नूतन इमारतीसाठी देणगी दिली तर शाळा कधीच पूर्ण होऊन जाईल, असे सांगून त्यांनी स्वतः शाळेच्या बांधकामासाठी 11000 रुपयांचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक ए. वाय. शहापूरकर यांचेकडे सुपूर्द करून इतरांनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य, सदस्या व इतर मान्यवरांना मोहन भैरटकर, संगीता अष्टेकर, शाळा सुधारणा सदस्य, शिक्षकवृंद यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फळांची टोपली देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सहशिक्षक यु. पी. चौगुले यांनी केले. आय. जी. तारोडकर यांनी आभार मानले.









