वार्ताहर / कंग्राळी खुर्द
कंग्राळी खुर्द येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्राम पंचायतीने कंबर कसली आहे. मंगळवारपासून शनिवारपर्यंत गाव बंद करण्यासाठी मंगळवारी ग्राम पंचायतीसह जि. पं. सदस्य आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून ग्रामस्थांना विशेष करून व्यापारी वर्गाला गर्दी टाळण्यासाठी आवाहन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी दिली. कंग्राळी खुर्द गावातील बांधितांची संख्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची बैठक ग्राम पंचायत आवारातील महालक्ष्मी मंदिर परिसरात झाली.
यावेळी ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाला कडक नियमांचे पालन करत व्यवहार करण्याचे ठरविण्यात आले. त्यांनी अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी सकाळीच ग्राम पंचायत उपाध्यक्षा ज्योती पाटील, जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, विनायक कम्मार, महेश धामणेकर, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, मधुमती पाटील, विणा पुजारी, कमला पाटील, भाग्यश्री गौंडवाडकर, मिना मुतगेकर, रेखा पावशे, लता पाटील यांच्यासह ग्राम विकास आघाडी अध्यक्ष आर. आय. पाटील, ग्रा. पं. चे क्लार्क किसन हदगल यांनी लोक जागृतीमध्ये सहभाग दर्शविला होता.
नियमांचे उल्लंघन केल्यास कावाईचा बडगा
नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास बुधवारपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात करणार असल्याचा इशारा ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी दिला आहे.









