बऱयाच वैद्यक व्यावसायिकांचे काम बंद असल्याचा परिणाम सुरुवातीला अल्पकाळासाठी वाढ
रत्नागिरी / प्रतिनिधी
टाळेबंदी सुरु झाल्यानंतर अनेक लोकांनी रक्तदाब व मधुमेहाची औषधे मोठय़ा प्रमाणात खरेदी करून साठा ठेवला होता. सुरुवातीच्या टप्प्यात औषध विक्रीत वाढ झाली असली तरी आता मात्र त्यात 60 टक्के एवढी घट झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले, टाळेबंदी सुरु झाली तेव्हा अनेकांना भविष्यातला अंदाज घेता येत नव्हता. आपल्या घरी औषधाचा पुरेसा साठा असावा, असे अनेकांना वाटले. नियमित औषधे घेणाऱया लोकांनी त्यासाठी तजवीज केली. मधुमेह आणि रक्तदाब विकाराला कायम औषधे घ्यावी लागतात. अचानक टंचाई निर्माण होवू नये म्हणून त्यांनी नेहमीच्याच दुकानातून औषधे खरेदी करून ठेवली.
सुरुवातीच्या टप्प्यात अशा खरेदीमुळे औषधाची विक्री मोठय़ा प्रमाणात वाढली. जवळपास 40 टक्के एवढी ही विक्री वाढली. पुढच्या टप्प्यात म्हणजे महिनाभराने यात बदल झाला. अनेक वैद्यक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवला आहे. यामुळे साहजिकच त्यांच्याकडे रूग्ण जात नाहीत. आपोआपच औषधाची मागणी कमी होते. औषध विक्रीचे मान बरेच कमी झाले आहे. ते जवळपास 60 टक्के एवढे घटले आहे, असे ते म्हणाले.
किरकोळ औषध विक्रेत्यांचा व्यवसाय कमी झाला आहे. पूर्वीसाठा शिल्लक आहे. यामुळे घाऊक विक्रेत्यांची वसुली होत नाही. रत्नागिरी जिह्यात 550 हून अधिक किरकोळ विक्रेते आहेत आणि सुमारे 70 घाऊक विक्रेते आहेत. इन्शुलिनसारख्या आवश्यक औषधांचे घाऊक विक्रेते जिल्हास्तरावर नेमण्यात आले आहेत. त्यामुळे या औषधाचा पुरेसा साठा प्रत्येक जिह्यात उपलब्ध आहे. इन्शुलिनसह कोणत्याही औषधाचा तुटवडा नाही. अनेक औषध विक्रेते ग्राहकांना घरपोच औषध सेवा देत आहेत तीही विनामूल्य. याबद्दल आम्हाला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
औषध विक्रेत्यापैकी काहीजणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा मृत्यूही झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर जनतेची सेवा म्हणून औषध विक्रेते आपापले काम करत आहेत. त्यांना शासकीय स्तरावरून कोरोना विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी आम्ही केली आहे. शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे उन्मेश शिंदे यांनी सांगितले.









