ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी आणखी एका शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रावसाहेब आम्ले असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, काल मंगळवारी देखील उत्तम नगर बौद्धनगर वॉर्डाचे माजी नगरसेवक नितीन साळवी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते.
शिवसेनेचे पडेगावचे माजी नगरसेवक रावसाहेब आम्ले यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. 25 जून रोजी त्यांना घाटी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. पण त्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्यांचं निधन झालं. शिवसेना नगरसेवकांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 7300 वर पोहोचली आहे. सध्या 3149 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.









