अमेरिकन ओपन टेनिस : व्हेरेव्ह, शॅपोव्हॅलोव्ह विजयी, क्विटोव्हा, केर्बर स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्स, जेनिफर ब्रॅडी, कझाकची युलिया पुतिनत्सेव्हा, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, शॅपोव्हॅलोव्ह यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. जर्मनीची अँजेलिक केर्बर, झेकची पेत्र क्विटोव्हा, ऍनेट कोन्टावेट यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
अनेक चॅम्पियन खेळाडू स्पर्धेबाहेर पडत असताना ओसाकाने मात्र भक्कम खेळाचे प्रदर्शन करीत कोन्टावेटचा 6-3, 6-4 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. बिगरमानांकित शेल्बी रॉजर्सने चार मॅचपॉईंट्स वाचवत विम्बल्डन चॅम्पियन क्विटोव्हाला 7-6 (7-5), 3-6, 7-6 (8-6) असा धक्का दिला. सुमारे पावणेतीन तास ही लढत रंगली होती. 28 व्या मानांकित ब्रॅडीने केर्बरला 6-1, 6-4 असे चकित करीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुतिनत्सेव्हाने आठव्या मानांकित पेत्र मार्टिकवर 6-3, 2-6, 6-4 अशी मात करून तिला स्पर्धेबाहेर घालविले. पुरुष एकेरीत अलेक्झांडर व्हेरेव्हने 18 बिनतोड सर्व्हिस करीत अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिनाचा 6-2, 6-2, 6-1 असा धुव्वा उडवित आगेकूच केली. कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हने डेव्हिड गॉफिनचा 6-7 (0-7), 6-3, 6-4, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो कॅनडाचा पहिला खेळाडू आहे.









