वृत्तसंस्था/ मियामी
येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स टेनिस स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका तसेच ऑस्ट्ऱेलियाची टॉप सीडेड आणि विद्यमान विजेती ऍश्ले बार्टी यांनी महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बेलारूसच्या अझारेंका आणि बेल्जियमच्या मर्टेन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात जपानच्या ओसाकाने बेल्जियमच्या 16 व्या मानांकित एलीस मर्टेन्सचा 6-3, 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. जपानची ओसाका ही ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम विजेती तसेच माजी अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेती आहे.
ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड बार्टीने बेलारूसच्या माजी टॉप सीडेड अझारेंकावर 6-1, 1-6, 6-2 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्याचप्रमाणे युक्रेनच्या स्विटोलिनाने झेकच्या क्विटोव्हाचा 2-6, 7-5, 7-5 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे.
पुरूषांच्या विभागात रशियाच्या रूबलेव्हने हंगेरीच्या फुक्सोव्हिक्सचा 6-2, 6-1, क्रोएशियाचा मारिन सिलीकने इटलीच्या मुसेटीचा 6-3, 6-4, कॅनडाच्या रेओनिकने फ्रान्सच्या हम्बर्टचा 6-4, 7-5, पोलंडच्या हुरकेझने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हाचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले.









