वृत्तसंस्था/ टोकियो
2021 साली जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्रीडा ज्योतीच्या प्रवासाला प्रारंभ यापूर्वीच झाला आहे. जपानमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने चालू महिन्याच्या अखेरीस ऑलिम्पिक क्रीडा ज्योती प्रवासाचा ओसाका शहरातील टप्पा रद्द करण्यासंदर्भात विचार चालू आहे. दरम्यान ऑलिम्पिक क्रीडाज्योतीचा ओसाका शहरातील टप्पा रद्द करण्यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा आयोजकांनी सांगितले आहे.
जपानमधील ओसाका शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या शहराच्या महापौरांनी चिंता व्यक्त केली आहे. ओसाका शहरातील क्रीडा ज्योतीचा टप्पा 14 एप्रिल रोजी आयोजित केला आहे. क्रीडा ज्योतीच्या या रिलेमध्ये सुमारे 10,000 धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. 23 जुलैला टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास 23 जुलै अखेर समाप्त होईल.









