सर्चिंग फॉर शीलाचा ट्रेलर प्रसारित
मां आनंद शीला यांना ओशो यांच्या सर्वात घनिष्ठ सहकारी मानले जायचे. पण दोघांदरम्यानची वादग्रस्तता कुणापासूनच लपून राहिलेली नाही. मागील काही काळापासून जणू अज्ञातवासात जगल्यावर मां आनंद शीला 34 वर्षांनी भारतात परतल्या आहेत. ओशो यांच्यासोबतचे त्यांचे भावबंध, वादग्रस्तता आणि अनेक गोष्टी एका रहस्याप्रमाणे राहिले आहेत. आता या सर्वांचे उत्तर लवकरच मिळणार आहे. मां आनंद शीला यांच्यावर एक माहितीपट तयार झाला असून यात त्यांच्या जीवनाविषयी सांगण्यात येणार आहे. याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे.
सर्चिंग फॉर शीला हा माहितीपट 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. नेटफ्लिक्सच्या या माहितीपटात रजनीश यांच्या माजी प्रवक्त्यांच्या कहाणीविषयी विस्तृतपणे सांगण्यात आले आहे.

मां आनंद शीला या श्री रजनीश यांच्या सर्वात जवळच्या सहकारी होत्या. त्या ओशोंच्या सर्वात मोठय़ा अनुयायी होत्या. ओशो यांच्या ओरेगन येथील आश्रम रजनीशपुरमचे व्यवस्थापन त्या पाहायच्या. त्यांच्यावर 1986 मध्ये आश्रमात अस्थिरता फैलावण्याचा आणि हत्येचा आरोपही झाला होता. 1984 मध्ये रजनीशपुरमच्या आत झालेल्या जैव-दहशतवादी हल्ल्यासाठी त्यांनाच जबाबदार धरले जात होते. त्यांना 20 वर्षांची शिक्षा झाली असली तरीही केवळ 39 महिने तुरुंगात काढले होते. 2019 मध्ये दीर्घकाळानंतर एका मुलाखतीसाठी त्या भारतात आल्या होत्या.









