सत्तेवर आल्यास 2 मुख्यमंत्री नेमणार : दोन पक्षांसोबत आघाडी
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी आघाडी ‘भागीदारी परिवर्तन मोर्चा’ उदयास आला आहे. या आघाडीत असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, बाबू सिंह कुशवाह यांचा जन अधिकार पक्ष आणि वामन मेश्राम यांचे बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉई फेडेरशन सामील आहे. तिन्ही नेत्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे. या आघाडीचे समन्वयक बाबू सिंह कुशवाह असणार आहेत.
ही आघाडी सत्तेवर आल्यास दोन मुख्यमंत्री नेमले जाणार आहे. एक मुख्यमंत्री दलित तर दुसरा ओबीसी समुदायाचा असणार आहे. याचबरोबर तीन उपमुख्यमंत्री नेमले जाणार असून त्यात मुस्लीम समुदायाला प्रतिनिधित्व मिळणार असल्याचे ओवैसी यांनी सांगितले आहे.
या आघाडीत आणखीन काही पक्ष सामील होऊ शकतात. सप आणि भाजप यांच्यातील लढाई आता भाजप आणि भागीदारी परिवर्तन मोर्चादरम्यान होणार आहे. सप आघाडी तिसऱया क्रमांकावर फेकली गेल्याचा दावा बाबू सिंह कुशवाह यांनी केला आहे.
ओवैसी यांच्या पक्षाने उत्तरप्रदेशात एका ब्राह्मण नेत्याल संधी दिली आहे. या कारणामुळे त्यांचा पक्ष चर्चेत आहे. एआयएमआयएमच्या वतीने पंडित मनमोहन झा हे गाझियाबादच्या साहिबाबाद मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.









