ऑनलाईन टीम/तरुण भारत
‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करत हल्ला गुरुवारी सायंकाळी करण्यात आला होता. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर अज्ञान व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी पोलिसांनी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक केली. गेल्या अनेक काळापासून ते हल्ल्याची तयारी करत होते, अशी माहिती समोर आली होती. त्यातच आता ओवेसी यांना जीवे मारण्यासाठीच हा हल्ला केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य आरोपी सचिनने दिलेल्या कबुली जबाबात त्याला मोठा राजकीय नेता व्हायचे आहे आणि ओवेसीचे भाषण ऐकून तो अस्वस्थ झाला. त्यामुळेच त्याने त्याचा जवळचा मित्र शुभमसोबत मिळून ओवेसीच्या हत्येचा कट रचला होता, असा खुलासा त्याने पोलिसांच्या चौकशीत केला आहे.









