- तरुण भारतमधून केलेल्या आवाहनानंतर अनेक दात्यांनी केली होती मदत
- मुंबई खारघर येथील हॉस्पिटलमध्ये 10 तास चालली शस्त्रक्रिया
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
ओरोस मधील उत्कर्षा कदम या सहा महिन्याच्या चिमुकल्या मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी तरुण भारतमधून मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेक दात्यांनी मदतीचा हात दिला. त्यानंतर या चिमुकलीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. मुंबई खारघर येथील हॉस्पिटलमध्ये 10 तास शस्त्रक्रिया चालली होती. त्यामुळे उत्कर्षाला जीवदान मिळाले असून तिची प्रकृती आता उत्तम आहे.
ओरोस-सिध्दार्थनगर येथील कृष्णा भगवान कदम यांची सहा महिन्याची मुलगी उत्कर्षाला सतत श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. कणकवली येथील बालरोगतज्ञ डॉ. नितीन शेटय़े यांच्याकडे तपासणी केली असता तिच्या हृदयाकडील चार रक्तवाहिन्या एकत्र असल्याने फुफुसाद्वारे शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त पुरावठय़ाची क्रिया नीट होत नाही. अशुद्ध रक्ताचा पुरवठा जास्त होत आहे. हृदयात छिद्र असल्याने शुद्ध रक्ताचा पुरवठा थोडय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे श्वसनक्रिया जलद गतीने होऊन श्वास घेताना त्रास होत आहे, असे निष्कर्ष निघाले होते. त्यामुळे उत्कर्षाच्या हृदयाची शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरानी सांगितल. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन लाख रुपये खर्च असल्याचे फेबुवारी 2021 महिन्यात उत्कर्षा तीन महिन्यांची असताना सांगण्यात आले होते.
तीन लाख रुपये खर्च करावा लागणार आहे असे समजताच उत्कर्षाचे वडील कृष्णा यांना धक्काच बसला. मोलमजुरी करून पोट भरणाऱयांनी एवढे पैसे आणायचे कुठून आणि शस्त्रक्रिया तर करावीच लागणार आहे असा प्रश्न पडला होता. हसत्या खेळत्या तीन महिन्याच्या चिमुकलीला आपल्याला काय होतंय हे कळतही नसेल, पण तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यास निश्चितच तिला जीवदान मिळेल, ती हसेल, खेळेल-बागडेल. त्यासाठी तिची हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत करणे अत्यंत आवश्यक होते.
हे लक्षात घेऊन तरुण भारतमधून उत्कर्षाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर अनेक दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. मालवणमधील कापड व्यावसायिक संतोष सावंत यांनी तर आपल्या 25 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने 25 हजारांची मदत केली. अशा अनेक दात्यांनी मदत केली. त्यामुळे उत्कर्षाला नवी मुंबई खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्या हॉस्पिटलचे डॉ. प्रतिभा रश्मी मुर्ती, आणि डॉ. आशिष कटवा या दोन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दहा डॉक्टराच्या टीमने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दहा तास यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली आणि उत्कर्षाला जीवदान दिले.
उत्कर्षाच्या आजोबांनी मानले सर्वांचे आभार
उत्कर्षाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी तरुण भारतमधून आवाहन केल्यानंतर अनेक लोकांनी आर्थिक मदत केली अनेकांनी चांगला सल्लाही दिला. तसेच श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केली आणि जीवदान दिले. खरोखरच सर्वांनी केलेल्या मदतीमुळे आपली नात उत्कर्षाला जीवदान मिळाले. सर्वांचे मनापासून आभार मानत असल्याचे सांगत उत्कर्षाचे आजोबा भगवान नागेश कदम अक्षरशः भावूक झाले होते.









