मॉडर्नाकडून बूस्टर डोस निर्मितीची घोषणा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
दक्षिण आफ्रिकेत मिळालेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनवरून धोका वाढत चालला आहे. हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असून मल्टी म्युटेशनसोबत यात शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येते. पण याचदरम्यान एक दिलासानजक वृत्त समोर आले आहे. संशोधकांनुसार वर्तमान लस ओमिक्रॉन व्हेरियंटवरही प्रभावी ठरू शकते. पण लस अधिक प्रभावी ठरण्यासाठी यावर संशोधनाची गरज आहे.
नवा कोरोना व्हेरियंट ओमिक्रॉनच्या विरोधात बूस्टर शॉट तयार करणार असल्याचे मॉडर्ना या अमेरिकेतील औषध कंपनीने जाहीर केले आहे. नव्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी कंपनी काम करत असून स्वतःच्या लसीला नव्या व्हेरियंटचा विचार करत अधिक प्रभावी करणार आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉन चिंतेची सबब ठरला आहे. याच्या विरोधातील आमच्या रणनीतिला लवकरात लवकर मूर्त स्वरुप देणार असल्याचे मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बॅन्सेल यांनी म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेत मिळाला व्हेरियंट
कोरोनाच्या दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या व्हेरियंटला ओमिक्रॉन (बी.1.1.529) नाव देण्यात आले. या व्हेरियंटचे एकूण 50 प्रकारचे म्युटेशन असून यात 30 याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये असल्याचे सांगण्यात येते. यामुळे तो डेल्टा व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचे मानले जातेय. या नव्या व्हेरियंटमुळे दक्षिण आफ्रिकेत मागील एक आठवडय़ात नव्या रुग्णसंख्येत 200 टक्क्यांची वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून हा व्हेरियंट हाँगकाँग, इस्रायल आणि बोत्सवानापर्यंत पोहोचला आहे.
जुन्या स्ट्रेननुसार लस
जगात आतापर्यंत उपलब्ध सर्व लसींना चीनमध्ये मिळालेल्या मूळ विषाणूच्या हिशेबाने तयार करण्यात आले आहे. पण ओमिक्रॉन व्हेरियंट मूळ विषाणूपेक्षा खूपच वेगळा आहे. या पार्श्वभुमीवर या व्हेरियंटवर वर्तमान लस कमी प्रभावी ठरू शकते किंवा त्याची प्रभावोत्पादकता कमी राहू शकते अशी भीती व्यक्त होतेय, पण याबद्दल कुठलीच ठोस माहिती प्राप्त झालेली नाही.









