मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र ओबीसीमध्ये घुसखोरी नको – विजय वडेट्टीवार
ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील ओबीसी समाजाची सद्यस्थितीत बिकट अवस्था आहे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, नोकरी, तसेच राजकारणासाठी आरक्षण मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. ही लढाई देशभर घेवून जाणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत शनिवारी केले. घटननेने दिलेला हक्क मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसून ओबीसांनी एकसंघ व्हावे, असे आवाहन केले. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होवू देणार नसल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
सांगलीत स्टेशन चौक येथे ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या ओबीसी आक्रोश परिषदेत मंत्री वडेट्टीवार बोलत होते. मंत्री वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आम्ही त्यांच्या विरोधात नाही. पण ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. घटनेने ओबीसांनी 27 टक्के आरक्षण दिले आहे. पण 52 टक्कयावर घालवून ते संपविण्याचे कारस्थान केले जात आहे. प्रसंगी घटना दुरुस्ती करा, 50 टक्यावर घेवून जावा. 70-80 टक्के करा, सर्वांना आरक्षण दया, त्याला आमचा विरोध नाही. आमच्या हिश्यातील देवू देणार नाही. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत घुसखोरी होवू दिली जाणार नाही. आमच्या समाजाच्या पोटावर उठू नका, गरीब म्हणून आवाज दाबण्याचे काम करू नका, आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही, मराठा-ओबीसीमध्ये भांडण लावण्याचे कामही केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.