क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात जमशेदपूर एफसीने विजयाची नोंद करताना ओडिशा एफसीला एकमेव गोलने पराभूत केले. हा सामना बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आला.
जमशेदपूर एफसीला तीन गुण प्राप्त करून देणारा गोल पहिल्या सत्रात मोहम्मद मोबाशीरने केला आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. या विजयाने जमशेदपूर एफसीचे आता 15 सामन्यांतून चार विजय, सहा बरोबरी आणि पाच पराभवाने 18 गुण झाले आहेत. ते आता सहाव्या स्थानावर आहेत. शेवटच्या स्थानावर असलेल्या ओडिशा एफसीचा हा आठवा पराभव होता. केवळ एक विजय आणि पाच बरोबरीमुळे ओडिशाचे फक्त 8 गुण आहेत.
कालच्या सामन्यात जमशेदपूर एफसीने ओडिशावर वर्चस्व ठेवले. प्रतिस्पर्धी संघाचा गोलरक्षक अर्शदीप सिंगच्या उत्कृष्ट गोलरक्षणामुळे जमशेदपूर एफसीची गोलसंख्या एकवरच मर्यादीत राहिली. सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला राकेश प्रधानच्या पासवर सिमीनलॅन डुंगलचा गोलमध्ये जाणारा फटका गोलरक्षक अर्शदीप सिंगने अडविला. पहिल्या सत्रात गोल करण्याच्या कित्येक संधी गमविल्यानंतर शेवटी मध्यंतराला चार मिनिटे शिल्लक असताना गोल नोंदविला.
मोहम्मद मोबाशीरने हाणलेला लांब पल्ल्यावरील फटक्यावर नेरीजूस वाल्सकीस समोर असल्याने गोलरक्षक अर्शदीप सिंग ताब्यात घेण्यात किंवा परतविण्यातही अपयशी ठरला आणि चेंडू सरळ गोलात गेला. दुसऱया सत्राच्या आरंभालाच अर्शदीप सिंगने आपली कमाल दाखविताना आलेक्झांडर लिमाने हाणलेला फटका आपल्या डाव्या बाजुने झेपावत अडविला.
सामन्याच्या 59 व्या मिनिटाला मोहम्मद मोबाशीर आणि नेरीजूस वाल्सकीसची धोकादायक चाल प्रतिस्पर्धी बचावफळीने उधळून लावली. ओडिशाची पहिली धोकादायक चाल 71 व्या मिनिटाला रचली गेली. यावेळी डायगो मॉरिसियोच्या पासवर पॉल रॅमफँगझाऊआचा फटका गोलपोस्टच्या बाजूने गेल्याने ओडिशाची गोल बाद करण्याची संधी हुकली. प्रतिआक्रमणात केलेल्या चालीवर जमशेदपूर एफसीची गोल करण्याची संधी दुसऱयाच मिनिटाला हुकली. 86 व्या मिनिटाला आलेक्झांडर लिमाच्या पासवर परत एकदा फारुख चौधरीचा फटका बाहेर गेला. शेवटच्या क्षणी तर त्यांचा फटका गोलच्या उजव्या पोस्टला लागून परत खेळात आला. या सामन्यात उत्कृष्ट खेळ करणाऱया सिमीनलॅन डुंगलला सामनावीराचा पुरस्कार व रोख 50,000 प्राप्त झाले.









