जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये सामील – 45 वर्षीय आशा कार्यकर्त्या मतिल्दा कुल्लू यांचा गौरव
वृत्तसंस्था / भुवनेश्वर
ओडिशातील 45 वर्षीय आदिवासी महिला आणि आशा सेविका मतिल्दा कुल्लू यांना फोर्ब्सने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सामील केले आहे. कुल्लू या सुंदरगढ जिल्हय़ातील बडगाव तालुक्यातील गर्गडबहल गावात मागील 15 वर्षांपासून आशा कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत.
45 वर्षीय कुल्लू यांना या क्षेत्रातील काळी जादू यासारख्या सामाजिक अभिशापाला मुळापासून उखडून टाकत समाप्त केले आहे. त्यांच्या याच कामगिरीमुळे फोर्ब्सने त्यांना प्रसिद्ध बँकर अरुंधती भट्टाचार्य आणि अभिनेत्री रसिका दुग्गल यासारख्या व्यक्तिमत्त्वांसोबत 2021 मधील जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे.
मतिल्दा कुल्लू यांचा दिनक्रम पहाटे 5 वाजता सुरू होतो. कुटुंबातील चार जणांची जबाबदारी तसेच घरातील गुरांच्या देखभालीनंतर त्या सायकल घेत आशा कार्यकर्त्याशी संबंधित कामांसाठी बाहेर पडतात. गावातील प्रत्येक उंबरठय़ावर जाऊन दररोज नवजात आणि किशोर मुलींचे लसीकरण प्रसुतीपूर्व तपासणी, प्रसुतीनंतरची तपासणी, जन्माची तयारी, स्तनपान आणि महिलांना सल्ला, एचआयव्हीसह साफ-सफाई आणि संक्रमणापासून वाचण्यासाठी माहिती देणे मतिल्दा यांचे काम आहे.
लोकांमध्ये जागरुकता
लोकांनी आजारी पडल्यावर रुग्णालयात जाण्याचा विचार केला नव्हता. लोकांना रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्यावर ते माझी थट्टा करायचे. हळूहळू लोकांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजाविला. आता ते छोटय़ा आजारांसाठीही रुग्णालयात जाऊन उपचार घेत आहेत असे मतिल्दा सांगतात. मतिल्दा यांनी प्रयत्न केले नसते तर त्यांच्या गावातील लोक आरोग्यविषयक आजारांसाठी जादूटोण्याची मदत घेत राहिले असते.
कोरोनाकाळात भरीव कार्य
कोरोना महामारीदरम्यान मतिल्दा यांची जबाबदारी कित्येकपटीने वाढली. कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांची तपासणी करण्यासाठी त्यांना प्रतिदिन 50-60 घरांमध्ये जावे लागत होते. लसीकरण सुरू झाल्यावर ग्रामस्थांना लस घेण्यासाठी समजाविणे त्यांना अवघड ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.









