लॉकडाऊनपासून बरेच जण ओ.टी.टी प्लॅटफॉर्म (over the top) वरील साहित्याचा आस्वाद घेऊ लागले आहेत. त्यापूर्वी चित्रपट किंवा नाटक चित्रपटगृह किंवा रंगभूमीवरच बघायला मिळायचे. नाटकाची किंवा चित्रपटाची वेळ बघून कुटुंबासह तिकडे जाऊनच या मनोरंजनाचा आस्वाद घेता यायचा. त्याचबरोबर त्यामध्ये शक्मयतो काम करण्याची संधी नामवंत अभिनेता आणि अभिनेत्रींनाच मिळायची. सामान्य व्यक्तीने चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता/अभिनेत्री म्हणून आपले नाव कमावणे खूप दुर्मीळ होते. पण ओटीटी माध्यमांनी हा चित्रपट पाहण्याचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. ऍमेझॉन, प्राईम व्हीडिओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार अशी कितीतरी ओटीटी माध्यमे आज उपलब्ध आहेत. घरबसल्या आज माणूस जुन्या, नवीन, सर्व चित्रपट आणि सिरियल्सचा आस्वाद थोडय़ाच पैशात घेऊ शकतो. एकाच माध्यमावर जगभरातील विविध भाषांचे, विषयांचे आणि प्रकारचे मनोरंजक चित्रपट आपल्याला या ऍप्सवर उपलब्ध आहेत. माहितीपट, प्रणयकथा, रोमांचक कथांपासून दूरचित्रवाणीवरील सिरियल्स, असे विविध विषय एकाच ठिकाणी बघायला मिळतील असा कोणी विचारदेखील केला नसेल. जशी ओटीटी माध्यमांनी प्रेक्षकांसाठी ही क्रांती घडवली आहे, तसेच त्यांनी जगभरातील कलाकारांचे जीवन बदलले आहे. पूर्वी चित्रपट किंवा नाटक ही दोनच मनोरंजनाची साधने असल्यामुळे बऱयाच कलाकारांना प्रतिभा असूनसुद्धा आपले कौशल्य लोकांपर्यंत पोहोचवता येत नव्हते. कारण त्यावेळेला निर्माता आणि दिग्दर्शकसुद्धा ठरावीक कलाकारांबरोबच काम करायचे. एवढेच नव्हे तर कित्येक लोकांना दिग्दर्शन विभागातही प्रवेश करता आला नाही.

पण ओटीटी माध्यमांमुळे या सर्व कलाकारांच्या संधींच्या क्षितिजाचा विस्तार झाला आहे. नवनवीन कलाकार आज या ओटीटीच्या पडद्यावर आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर ओटीटी माध्यमांनी अनेक नवीन विषयसुद्धा प्रेक्षकांसमोर आणले. बॉलीवूडच्या बाहेरचे, विविध भाषातील अप्रतिम चित्रपट आणि कथामालिका जगाला माहिती होऊ लागल्या आहेत.
ओटीटीवरील अशाच काही भारतीय कथामालिकांबद्दल जाणून घेऊया.
1. रॉकेट बॉईज (माध्यम-सोनी लिव्ह)
आपण बऱयाचदा स्वातंत्र्यवीरांच्या, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा गौरव करतो. चित्रपटातील अभिनेत्यांना देव मानतो. पण प्रयोगशाळेत दिवसरात्र काम करणाऱया शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक योगदानाची कबुली देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. सोनी लिव्हवरील ‘रॉकेट बॉईज’ हे केवळ ज्ञानाचे उच्च प्रमाण असलेले आणि सामग्रीने समृद्ध असलेले एक ऐतिहासिक कालखंड-नाटकच नाही तर सी.व्ही. रामन, होमी भाभा, विक्रम साराभाई, शांतीस्वरूप भटनागर आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यासारख्या आपल्या देशातील काही असामान्य व्यक्तींना योग्य श्रद्धांजली आहे. या दिग्गज लोकांचे या देशासाठीचे योगदान इतक्मया सुंदरपणे जगासमोर मांडल्याबद्दल त्यातील सर्व लोकांचे खूप अभिनंदन करायची इच्छा होते.
2. फॅमिली मॅन (माध्यम-ऍमेझॉन प्राईम व्हीडिओ)
वडील हे प्रत्येक मुलाच्या आयुष्यातले सुपर हिरो असतातच. अशाच एका हिरो वडिलांची गोष्ट ही मालिका सांगते. दिसताना साधासुधा दिसणारा सामान्य माणूस, आपल्या मध्यमवर्गीय घरातून बायकोने दिलेला डबा घेऊन कामावर जायला बाहेर पडतो. पण त्या सामान्य माणसामध्ये एक देशप्रेमी गुप्त अभिकर्ता (सरकारी सिक्रशट एजण्ट) देशाच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावत असतो. मनोज वाजपेयी हा पूर्णपणे वेगळय़ा पार्श्वभूमीतून सिनेसृष्टीमध्ये आला आहे. ना नातेवाईकांची मदत ना राजकीय पाठबळ. स्वतः धडपड करून आज मनोज वाजपेयीने आपले नाव एक यशस्वी अभिनेता म्हणून सिनेजगात स्थापित केले आहे. त्याच्या अभिनयाचे कौशल्य या मालिकेमध्ये पालोपावली लक्षात येते आणि त्यातील त्याच्या भूमिकेचे धैर्य बघून अंगावर काटा येतो.
3. कोटा फॅक्टरी (माध्यम-नेटफ्लिक्स)
तारुण्य, त्यातील मित्रमैत्रिणी आणि प्रौढत्वाकडच्या प्रवासाबद्दल आत्तापर्यंत बरेच चित्रपट बनवले गेले आहेत. त्यामध्ये या अल्लड वयाला खूप वाढवून चढवूनदेखील दाखवले आहे. पण गप्पा, गोष्टी, मित्र, मज्जा या व्यक्तिरिक्त या वयाला एक पैलू आहे आणि तो म्हणजे स्पर्धा आणि अपेक्षांचा. स्वतःला विकसित करताना मुले मुली या वयात किती संघर्ष करत असतात आणि त्यामुळे कोणत्या मानसिकतेतून जात असतात हे फारसे कोणी दाखवत नाही. तेच गंभीर वास्तव या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळते. तरुण पिढीच्या खऱया भावना, त्यांच्या वेदना आणि त्यांच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व या मालिकेद्वारे आपल्याला पहायला मिळते.
4. पेट पुराण (madhyam- सोनी लिव्ह)
घरात पाळीव प्राणी असणे म्हणजे घरचा एक सदस्यच असल्यासारखे आहे. त्याची एखाद्या लहान मुलासारखीच काळजी घ्यावी लागते. ज्यांच्याकडे घरी कुत्रा किंवा मांजर आहे, त्यांना ‘पाळीव प्राणी पालक’ असे देखील म्हटले जाते. अशा वेळेला जेव्हा एक तरुण जोडपं घरी कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळतात तेव्हा काय धमाल येते हे या मालिकेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळते. हलकी फुलकी, मनोरंजक अशी ही मालिका पूर्ण कुटुंबाबरोबर बघण्यासारखी आहे.
5. रे ( मध्यम-नेटफ्लिक्स)
सत्यजित रे हे भारतातील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक. त्यांच्या कथाकथनाच्या शैलीने भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवली होती. सत्यजित रे एक भारतीय चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, लेखक, निबंधकार, गीतकार, चित्रकार, सुलेखनकार आणि संगीत संयोजक होते. या मालिकेमध्ये सत्यजित रे यांच्या व्यंगचित्रापासून सायकॉलॉजिकल थ्रिलरपर्यंत, चार लघुकथा पडद्यासाठी रूपांतरित केल्या आहेत. के के मेनन, राधिका मदन, अली फझल, गजराज राव इत्यादींसारख्या प्रतिभावान कलाकारांना घेऊन बनवलेली ही मालिका अतिशय मनोरंजक आहे.
अशाच कितीतरी विविध विषयांच्या मालिका आज ओ.टी.टी माध्यमावर उपलब्ध आहेत. भारतीय सिनेसृष्टी आता प्रायोगिक सिनेमाकडे वळू लागली आहे ज्यामुळे एक नवीन अनुभव प्रेक्षकांना घरबसल्या घेता येतो आहे. नवनवीन विषय, नव नवीन चेहरे आणि भरमसाठ प्रतिभेचा साठा या माध्यमांमध्ये आहे. वेळ आली आहे आता नवीन लोकांना, विषयांना आणि कथाकथनाच्या प्रकारांना आपल्या मनामध्ये जागा द्यायची. कारण आता फक्त चित्रपट पाहण्याचा अनुभवच बदलत नाही आहे, तर माणूस आता कथाकथनाकडे एका नवीन अद्भूत दृष्टिकोनाने पाहू लागला आहे. -श्राव्या माधव कुलकर्णी








