ओटवणे/प्रतिनिधी-
ओटवणे येथील सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानचे अभ्यासक तथा कवी कृष्णा देवळी लिखित श्री ब्राहमणेश्वर महात्म्य या पुस्तिकेचे प्रकाशन ओटवणे देवस्थानचे मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे शेरवाळेवाडीतील संस्थानकालीन ब्राह्मण स्थळाचा इतिहास व महत्त्व काव्यरूपात या पुस्तिकेत कृष्णा देवळी यांनी शब्दबद्ध केला आहे.
यावेळी या पुस्तिकेच्या निर्मितीला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे कृष्णा देवळी यांनी आभार मानून या पुस्तक निर्मितीमागे ब्राहमणेश्वराची प्रेरणा व चेतना असून मी केवळ निमित्त असल्याचे सांगितले. भक्तिरसाने भरलेल्या या पुस्तकाला प्रस्तावना सेवानिवृत्त केंद्रप्रमुख राजाराम चिपळूणकर यांची आहे.